विलगीकरण कक्षाची कठोर अंमलबजावणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:19 AM2021-06-11T04:19:17+5:302021-06-11T04:19:17+5:30
वाळवा तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या जास्त असलेल्या गावांना भेटी देत मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी सूचना दिल्या. यावेळी रवींद्र ...
वाळवा तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या जास्त असलेल्या गावांना भेटी देत मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी सूचना दिल्या. यावेळी रवींद्र सबनीस, शशिकांत शिंदे, डॉ. साकेत पाटील, नारायण देशमुख, जगन्नाथ माळी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील १० गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त आहे. या गावातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी तेथे विलगीकरण कक्षाची कठोरपणे अंमलबजावणी करा, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.
डुडी यांनी गुरुवारी कासेगाव, तांबवे, नेर्ले, पेठ, रेठरेधरण, कामेरी, बोेरगाव, जुनेखेड, वाळवा, बागणी अशा १० गावांना भेटी देऊन तेथील कोरोना संसर्गाची माहिती घेतली.
ते म्हणाले, एखादी व्यक्ती कोरोना पाॅझिटिव्ह आल्यास तो राहत असलेल्या १०० मीटर परिसरातील सर्व व्यक्तींची तपासणी करून घ्या. त्यामुळे कोरोनाचा प्रसार करणारे छुपे स्प्रेडर समोर येतील. खासगी डॉक्टरांकडून प्राप्त होणाऱ्या व्यक्तींची कोरोना चाचणी करा. बाधित रुग्णांच्या संपर्कातील इतर व्यक्तींचे गृहविलगीकरण व्यवस्थित करावे. जे ऐकणार नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर नियंत्रण ठेवा.
यावेळी तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, तालुका आरोग्याधिकारी डॉ. साकेत पाटील यांच्यासह सर्व अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट
उमेदवारांना सूचना
कृष्णा कारखाना निवडणूक संदर्भात बोलताना डुडी म्हणाले, सर्व उमेदवार व त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी कोरोना चाचणी करून घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत. बाहेरगावचा उमेदवार दुसऱ्या गावात प्रचारासाठी येत असेल तर त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून मगच प्रचार करावा. उमेदवारांनी सामाजिक भान ठेवून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करण्यावर भर द्यावा.