'मार्ड'चा संप; सांगली, मिरजेतील शासकीय रुग्णालयात रुग्णसेवा विस्कळीत
By संतोष भिसे | Published: February 24, 2024 05:46 PM2024-02-24T17:46:41+5:302024-02-24T17:47:12+5:30
सांगली : निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्ड संघटनेने सुरु केलेल्या संपाचा परिणाम सांगली व मिरज शासकीय रुग्णालयात जाणवू लागला ...
सांगली : निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्ड संघटनेने सुरु केलेल्या संपाचा परिणाम सांगली व मिरज शासकीय रुग्णालयात जाणवू लागला आहे. शनिवारी अनेक नियमित शस्त्रक्रिया रद्द झाल्या. सकाळी निवासी डॉक्टरांनी मिरजेत शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयासमोर निदर्शने केली.
सांगली व मिरजेतील सुमारे 290 निवासी डॉक्टर आंदोलनात सहभागी झाले आहेत. तातडीच्या सेवा सुरु असल्या तरी नियमित उपचार मात्र विस्कळीत झाले आहेत. आज शनिवार असल्याने रुग्णांची गर्दी तुलनेने कमी होती, त्यामुळे प्रशासनाला कामकाज हाताळणे शक्य झाले. सोमवारपर्यंत संप मिटला नाही, तर मात्र गंभीर परिणाम दिसणार आहेत.
संपामुळे आज क्ष किरण विभागातील नियमित चाचण्या बंद राहिल्या. तातडीच्या तपासण्या मात्र झाल्या. तातडीच्या शास्त्रक्रियादेखील झाल्या. वरिष्ठ निवासी डॉक्टर आणि प्राध्यापक तसेच विभाग प्रमुख स्वतः बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण विभागात उपस्थित राहिले. रुग्णसेवा विस्कळीत होऊ नये यासाठी प्रशासनाने पर्यायी व्यवस्था सज्ज ठेवली आहे.
संप आणि आंदोलनाचे नेतृत्व डॉ. अमोद भडभडे, डॉ. विजय कदम, डॉ. मोहिनी कोठावळे, डॉ. विवेक पाटील, डॉ. रोशनी राठोड, डॉ. अकिब कुरेशी, डॉ. प्रशांत विधाते, डॉ. आस्था चावला आदी करत आहेत.
आज संपावर चर्चा
दरम्यान, निवासी डॉक्टरांच्या संपासंदर्भात रविवारी मुंबईत बैठक होणार आहे. शासन प्रतिनिधी व आंदोलक यांच्यात चर्चा होणार आहे. त्यामध्ये संपावर तोडगा अपेक्षित आहे.