नववर्षाच्या पूर्वसंध्येला तीन कुटुंबांच्या स्वप्नांचा चुराडा
By Admin | Published: January 1, 2017 11:08 PM2017-01-01T23:08:15+5:302017-01-01T23:08:15+5:30
दुर्दैवी अपघातामुळे हळहळ : तिघा जीवलग मित्रांनी गमावले हकनाक जीव
इस्लामपूर : नव्या वर्षातील नव्या अकांक्षा, नवी स्वप्ने, नवे संकल्प साकार करण्याचं वय. मात्र या मनांना जबाबदारीचं भान ओळखता न आल्याने दुचाकीवरील वेगाने बेभान झालेल्या तिघा युवकांना हकनाक आपले प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना ३ कुटुंबांच्या स्वप्नांचा चुराडा करून केली. नववर्षाच्या पूर्वसंध्येला इस्लामपूर-राजारामनगर रस्त्यावर शनिवारी रात्री हा भीषण अपघात सर्वांच्या काळजाचा थरकाप उडवणारा ठरला.
गौरेश शिवाजी देशमुख (वय १६), प्रशांत प्रकाश नायकवडी (१८, दोघे रा. कापूसखेड, ता. वाळवा) व विठ्ठल सुभाष कुटे (१७ रा. लोणार गल्ली इस्लामपूर) अशी तिघा मृतांची नावे आहेत.
तिघेही कष्टकरी कुटुंबातील असल्याने या घटनेचा मोठा धक्का त्यांच्या नातेवाईकांना बसला आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री बाहेर पडलेल्या तिघांना काळाने मृत्यूच्या दाढेत ढकलले अन् तिन्ही कुटुंबांच्या अंगणात नववर्षाच्या नव्या इच्छा, आकाक्षांची सुखक किरणे पडण्याऐवजी दु:खाचा काळा डोंगर उभा राहिला.
या अपघातामधील प्रशांत नायकवडी हा इस्लामपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात कला शाखेच्या पदवीच्या प्रथम वर्षाचे शिक्षण घेत होता. महाविद्यालयात ये-जा करण्यासाठी याला कुटुंबियांनी दुचाकी (एमएच १० बीएस ५८६४) घेऊन दिली होती. शनिवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास प्रशांत आणि त्याचा गावातीलच मित्र गौरेश हे दोघे इस्लामपूरला आले. गौरेश हा परिसरातील वाहन पेंटिंग व्यवसायातील प्रसिध्द शिवाजी देशमुख यांचा मुलगा आहे. तेही कुटुंब कष्टकरी आहे, तर विठ्ठल कुटे हा मूळचा कवठेमहांकाळ परिसरातील असून, येथे लोणार गल्लीतील नातेवाईकांकडे आपल्या आई- वडिलांसह वास्तव्यास होता.
सहा महिन्यांपूर्वीच त्याच्या बहिणीचे लग्न झाले होते; तर विठ्ठल हा एकुलता होता. त्याचे वडील खासगी वाहनावर चालक म्हणून काम करतात, तर विठ्ठल हा येथील एका लॉजवर व्यवस्थापक म्हणून काम करत होता.
प्रशांत व गौरेशची विठ्ठलशी भेट झाल्यावर तिघेही प्रशांतच्या दुचाकीवरुन राजारामबापू कारखाना रस्त्यावरून निघाले. निनाईनगर परिसरात असताना समोरील ट्रकला ओलांडून जाण्याच्या प्रयत्नात हे तिघेही ट्रकची धडक बसून पाठीमागील चाकात सापडले आणि बघता बघता ५० फूट अंतरापर्यंत फरफटत जाऊन मृत्यूच्या दारी अधीन होऊन बसले. (वार्ताहर)
ट्रकचा माग काढण्याचा प्रयत्न
या अपघाताबाबत महेश शिवाजी पाटील (वय ३०, रा. कापूसखेड) यांनी पोलिसांत वर्दी दिली आहे. या अपघातातील अपघातग्रस्त ट्रक व चालकाने पलायन केले आहे. परिसरातील खासगी वसतिगृहाच्या सी. सी. टी. व्ही. फुटेजवरून पोलिस या ट्रकचा माग काढत आहेत.