सावंत-बाळू भोकरेच्या संघर्षातून टोळीयुद्धाचा भडका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 11:28 PM2017-09-24T23:28:11+5:302017-09-24T23:28:11+5:30
सचिन लाड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सावंत टोळीचा उजवा हात म्हणून बाळू भोकरेचे नाव आजही जिल्ह्यातील गुन्हेगारी जगतात घेतले जाते. टोळीचा विश्वासू साथीदार म्हणून बाळूची ओळख. याच बाळूवर शुक्रवारी हल्ला झाल्याने तो सावंत टोळीतून कधी आणि का फुटला? या प्रश्नाने पोलिसांना सतावून सोडले आहे. बाळू भोकरेचा उजवा हात म्हणून वावरणाºया शकील मकानदारची शुक्रवारी भरदिवसा ‘गेम’ झाल्याने सावंत आणि बाळू टोळीतील संघर्ष सुरू असल्याची खबर पोलिसांच्या कानावर पडली. भविष्यात पुन्हाही त्यांच्यात टोळीयुद्धाचा भडका उडण्याची चिन्हे आहेत.
गेल्या २० वर्षात सावंत टोळी व बाळू भोकरेचे नाव पोलिसांच्या रेकॉर्डवरुन कधीच पुसले गेले नाही. सातत्याने ही नावे गुन्हेगारी जगतात चर्चेत राहिली. सावंत व गुंड राजू पुजारी या प्रतिस्पर्धी टोळ्यांचा इतिहास साºया जिल्ह्याला माहीत आहे. या टोळ्यांमध्ये कधीच ‘मिलाफ’ झाला नाही. शहरातील गुन्हेगारी जगतात वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या नादात त्यांनी एकमेकांच्या टोळ्यातील सदस्यांची ‘गेम’ केली. अठरा वर्षांपूर्वी या टोळ्यांची शहरात प्रचंड दहशत होती. व्यापाºयांना खंडणीसाठी धमकावणे, अपरहण करणे हा त्यांचा धंदा. कित्येकदा त्यांच्यावर अटकेची कारवाई होऊनही त्यांच्या गुन्हेगारी कारवाया थांबल्या नाहीत. शेवटी तत्कालीन जिल्हा पोलिसप्रमुख रितेशकुमार यांनी सावंत-पुजारी टोळ्यावर महाराष्टÑ संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यांतर्गत कारवाई केली. या कारवाईतूनही या दोन्ही टोळ्या सहीसलामत बाहेर आल्या. पुढे राजू पुजारी तत्कालीन जिल्हा पोलिसप्रमुख अशोक कामटे यांच्या कारकीर्दीत चकमकीत ठार झाला. त्यानंतर या दोन्ही टोळ्या काही वर्षे घाबरुन शांत बसल्या.
सावंत टोळीबरोबर बाळू भोकरेलाही मोक्का लावला होता. राजू पुजारीचा विश्वासू साथीदार अकबर अत्तार याची २००८ मध्ये बकरी ईददिवशी सार्वजनिक शौचालयात ‘गेम’ करण्यात आली. याप्रकरणी भोकरेसह आठजणांना अटक झाली होती. या खुनातूनही भोकरेसह सर्वजण सहीसलामत सुटले. संपूर्ण आयुष्य सावंत टोळीसाठी घालविलेला भोकरे या टोळीतून कसा आणि का बाहेर पडला? या प्रश्नाने पोलिसांना सतावून सोडले आहे. वर्चस्ववादातून भोकरेचा सावंत टोळीशी संघर्ष सुरू असल्याची ‘खबर’ पोलिसांना शुक्रवारी शकील मकानदारची ‘गेम’ झाल्यानंतर लागली. त्यानंतर विश्रामबाग पोलिस, स्थानिक गुन्हे अन्वेषण व गुंडाविरोधी पथकाची ‘टीम’ भोकरेने वेगळी टोळी का तयार केली? यासंबंधी माहिती घेण्याच्या कामाला लागली.
भोकरेचा विश्वासू साथीदार म्हणून शकील मकानदार वावरायचा, अशी पोलिसांना माहिती मिळाली आहे. भोकरे, मकानदारसह चौघे दुचाकीवरुन जात असताना प्रतिस्पर्धी टोळ्यांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. यावरून हल्ला ‘पूर्वनियोजित’ होता, असे पोलिसांचे म्हणणे होते. सुदैवाने बाळू पळाल्याने बचावला. ‘गेम’ त्याचीच होती, असेही पोलिसांचे म्हणणे आहे. सावकारी वर्चस्व कोणाचे? या मुद्द्यातून बाळू सावंत टोळीतून बाहेर पडल्याची चर्चा आहे. त्यांच्या संघर्षातून निष्पाप शकीलचा बळी गेला. त्याला दोन लहान मुली आहेत.
भोकरे दुसºयांदा बचावला
तत्कालीन जिल्हा पोलिसप्रमुख दिलीप सावंत यांच्या कारकीर्दीत बाळू भोकरेच्या भुई गल्लीतील घरावर छापा टाकून चार पिस्तूल, मॅग्झिन, काडतुसे व चार मास्क जप्त करण्यात आले होते. भोकरेला अटकही झाली होती. त्याच्याविरुद्ध सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून तडीपार करण्याची कारवाई झाली होती. चार वर्षांपूर्वी त्याने नगरसेवक पदाची निवडणूक लढविली होती. दहा वर्षांपूर्वी सच्या टार्झनने ‘सिव्हिल’ चौकात बाळू भोकरेवर गोळीबार केला होता. यातून तो बचावला होता. सावंत टोळीच्या म्होरक्याची ‘सिव्हिल’ चौकात ‘गेम’ झाल्यानंतर सच्या टार्झनलाच प्रमुख संशयित म्हणून अटक झाली होती.