Strike of government employees: मिरजेत शासकीय रुग्णालयातील पारिचारीकांनी मध्यरात्रीच केले काम बंद, रुग्णसेवा सलाईनवर
By संतोष भिसे | Published: March 14, 2023 01:57 PM2023-03-14T13:57:40+5:302023-03-14T13:58:14+5:30
निवृत्त कर्मचारी, शिकाऊ पारिचारीकांच्या मदतीने बाह्यरुग्ण उपचार विभागात सेवा सुरु
सांगली : शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाचा मोठा फटका शासकीय रुग्णालयातील रुग्णांना बसला. अनेक शस्त्रक्रिया लांबणीवर टाकाव्या लागल्या. कंत्राटी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मदतीने आंतररुग्ण व बाह्यरुग्ण विभागातील सेवा सुरु ठेवण्यात आल्याचे पहायला मिळाले.
काल, सोमवारी (दि.१३) मध्यरात्री बारा वाजताच कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. मिरज शासकीय रुग्णालयात परिचारिका व अन्य आंदोलक कर्मचारी वॉर्डातून बाहेर पडले. गेटवर येऊन घोषणाबाजी केली. मंगळवारी सकाळी आवारात मोर्चा काढला. शासनाविरोधात घोषणाबाजी केली. सांगलीत शासकीय रुग्णालयातही आंदोलनामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला.
दोन्ही रुग्णालयांत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने रुग्ण सेवा सुरु ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला. परिचर्या महाविद्यालयातील शिकाऊ पारिचारीकांना रुग्णालयात मदतीला घेण्यात आले होते. त्याशिवाय काही निवृत्त कर्मचारीही मदतीला आले होते. त्यांच्या मदतीने बाह्यरुग्ण उपचार विभागात सेवा सुरु ठेवण्यात आल्या.
संपाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांत आंतररुग्ण विभागातून अनेक रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे काही वॉर्ड अक्षरश: रिकामे पडल्याचे पहायला मिळाले. राजपत्रित अधिकारी संपात सहभागी नसले, तरी त्यांनी पाठींबा दिला होता, त्यामुळे डॉक्टर संपात नव्हते. त्यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने क्ष-किरण विभाग, प्रयोगशाळा, बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, स्वयंपाकगृह, सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला. रुग्णांना दाखल करुन घेण्याचे प्रकर्षाने टाळले.
सांगलीत सकाळी आंदोलकांनी रुग्णालयाबाहेर ठिय्या मारला घोषणाबाजी केली. दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनात सहभागी झाले.