इस्लामपुरात तलाठ्यांचे दुसऱ्या दिवशीही कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:25 AM2021-03-19T04:25:14+5:302021-03-19T04:25:14+5:30
इस्लामपूर : तीन तलाठ्यांना प्रांताधिकारी नागेश पाटील यांच्याकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ गुरुवारी दुसऱ्या दिवशीही वाळवा, शिराळा तालुक्यातील तलाठ्यांनी काम ...
इस्लामपूर : तीन तलाठ्यांना प्रांताधिकारी नागेश पाटील यांच्याकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ गुरुवारी दुसऱ्या दिवशीही वाळवा, शिराळा तालुक्यातील तलाठ्यांनी काम बंद आंदोलन सुरू ठेवले. प्रांतांवरील कारवाईचा अहवाल शासनाला सादर करून त्याची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय तोडकर यांनी दिला आहे.
मंगळवारी, १६ मार्चच्या रात्री कार्यालयीन वेळेनंतर प्रांताधिकारी पाटील यांनी तलाठी अमर साळुंखे, अविनाश पाटील, महादेव वंजारी अशा तिघांना बोलावून घेतले. त्यानंतर कोर्टरूममध्ये जोराने आरडाओरडा आणि अर्वाच्य शिवीगाळ करत प्रांताधिकारी पाटील यांनी मारहाण केल्याचा आरोप या तलाठ्यांनी केला. या घटनेचे पडसाद विभागीय आयुक्तांपर्यंत पोहोचले आहेत. तलाठी संघटनेने आयुक्तांकडे निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. तसेच सोमवारपासून राज्यभरात कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी तलाठी संघटनेचे उपाध्यक्ष गौस महंमद लांडगे, वाळवा तालुकाध्यक्ष अतिष रसाळ, शिराळा तालुकाध्यक्ष महादेव वंजारी, तानाजी पवार, महादेव पाटील, जगन्नाथ कदम, विनायक यादव उपस्थित होते.
प्रांताधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली काम करणार नाही!
प्रांताधिकारी नागेश पाटील यांच्यावर कठोर कारवाई करावी. त्यांच्या नेतृत्वाखाली एकही कर्मचारी काम करणार नाही, असेही तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय तोडकर यांनी स्पष्ट केले.