खासगीकरण धोरणाला तीव्र विरोध; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या संपाला सरकारी कर्मचाऱ्यांचा पाठिंबा, सांगलीत निदर्शने
By अशोक डोंबाळे | Published: February 16, 2024 04:42 PM2024-02-16T16:42:09+5:302024-02-16T16:42:56+5:30
सांगली : अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली केंद्रीय कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी एक दिवसाचा संप केला आहे. या संपाला ...
सांगली : अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली केंद्रीय कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी एक दिवसाचा संप केला आहे. या संपाला पाठिंबा देण्यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. केंद्र आणि राज्य सरकारने शासकीय नोकऱ्यांमधील खासगीकरणाचे धोरण रद्द करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे विभागीय सचिव पी.एन. काळे यांनी दिला आहे.
अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने केंद्र सरकारच्या कर्मचारी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी, पीएफआरडीए बिल रद्द करा, सर्व शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद आणि शिक्षण क्षेत्रातील कंत्राटीकरण रद्द करण्यासाठी एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारलेला आहे. या संपला पाठिंबा म्हणून राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी जिल्हा मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर एक तास निदर्शने करून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला.
सांगलीतील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील अधिपरिचारिका, अधिपरिचारक आणि वर्ग चारचे कर्मचाऱ्यांनीही संपला पाठिंबा दिला. यावेळी पुणे विभागीय सचिव पी.एन. काळे यांनी एनपीएस पेन्शन बद्दल सुबोधकुमार समितीची भूमिका काय आहे, याबद्दल मार्गदर्शन केले.
यावेळी मध्यवर्ती संघटनेचे रवी अर्जुने, गणेश धुमाळ, विजय पाटील, शोभा मास्ते, सुहास रेपे, प्रकाश आवळे आदीसह मोठ्या संख्येने कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते.