सांगलीला चांदोलीचे पाणी देण्यास तीव्र विरोध, श्रमिक मुक्ती दलाने दिला तीव्र लढ्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 01:20 PM2023-12-06T13:20:48+5:302023-12-06T13:21:33+5:30

स्वत:ची कृष्णा नदी प्रदूषित करून चांदोलीवर डोळा कशासाठी?

Strong opposition to providing Chandoli water to Sangli, Shramik Mukti Dal has warned of fierce struggle | सांगलीला चांदोलीचे पाणी देण्यास तीव्र विरोध, श्रमिक मुक्ती दलाने दिला तीव्र लढ्याचा इशारा

सांगलीला चांदोलीचे पाणी देण्यास तीव्र विरोध, श्रमिक मुक्ती दलाने दिला तीव्र लढ्याचा इशारा

कोकरुड : चांदोली धरणातूनसांगली शहराला थेट पाणी देण्यास आमचा तीव्र विरोध आहे. आमच्या हक्काचे पाणी शिराळ्यासह तालुक्यातील सर्व गावे आणि वाड्या-वस्त्यांना प्रथम मिळाले पाहिजे. अन्यथा श्रमिक मुक्ती दल आणि पाणी वाटप संघर्ष समिती तीव्र लढा उभारेल, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे सदस्य वसंत पाटील यांनी दिला. ते पणुंब्रे वारुण (ता. शिराळा) येथे पत्रकार बैठकीत बोलत होते.

पाटील म्हणाले, शिराळा तालुक्यातील अनेक गावे, वाड्या-वस्त्या, गुढे पाचगणी पठार, उत्तर भाग, कऱ्हाड आणि पाटण तालुक्यांतील वाड्या-वस्त्या शेतीच्या पाण्यापासून आजही वंचित आहेत. धरण परिसरातील या गावांना पाणी देण्याचे नियोजन अजूनही झालेले नाही.

चांदोलीपासून रिळेपर्यंतच्या अनेक योजना मंजुरीनंतरही खितपत पडल्या आहेत. शासनाने अद्याप निधी दिलेला नाही. वारणा धरणामध्ये १९९१ पासून पाणी अडवण्यात येत आहे. याला ३२ वर्षे झाली तरी संपूर्ण शिराळा तालुका अद्याप ओलिताखाली आलेला नाही, अशी स्थिती असताना थेट सांगली शहराला चांदोली धरणाचे पाणी नेण्याचा घाट घातला जात आहे. त्याला आमचा कडाडून विरोध आहे.

ते म्हणाले, शिराळा तालुक्यातील जनता शेतीला पाणी नसल्याने हमालीसाठी मुंबईला जात आहेत. त्यांच्या शेतीला पाणी मिळाल्याशिवाय शेतकरी सुखी होणार नाही. मुंबईचा लोंढा थांबणार नाही. यासाठीच वारणेच्या पाण्याचा अट्टाहास आम्ही धरला आहे. मे २०२३ रोजी खराळे (ता. शिराळा) येथे श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पाणी परिषदेत पाण्याचा निर्धार झाला आहे. वंचित गावे ओलिताखाली आणून मुंबईचा लोंढा थांबविण्याचा निश्चय केला आहे. त्यासाठी या महिन्यात पुन्हा मेळावा होणार आहे.

कृष्णा प्रदूषित करुन चांदोलीवर डोळा 

कृष्णेचे पाणी दूषित होण्यामागील कारणे शोधून उपाययोजना राबवायला हव्यात. त्यासाठी सांगलीकरांनी पुढाकार घ्यायला हवा. त्यासाठी निधी खर्च केला पाहिजे. तसे न करता चांदोलीच्या शुद्ध पाण्यावर डोळा ठेवला जात आहे. स्वत:ची नदी प्रदूषित करून चांदोलीच्या पाण्यासाठी रेटा कशासाठी? असा सवाल शिराळा तालुक्यातील शेतकरी करत आहेत.

Web Title: Strong opposition to providing Chandoli water to Sangli, Shramik Mukti Dal has warned of fierce struggle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.