जत पूर्वभागामध्ये पावसाची दमदार हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 06:09 PM2019-10-14T18:09:13+5:302019-10-14T18:09:45+5:30
उमदीसह जत पूर्वभागातील काही गावात गेली दोन दिवस परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या भागात अलीकडच्या काळात हा पहिलाच मोठा पाऊस झाला. काही ठिकाणी ओढे-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत.
उमदी : उमदीसह जत पूर्वभागातील काही गावात गेली दोन दिवस परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या भागात अलीकडच्या काळात हा पहिलाच मोठा पाऊस झाला. काही ठिकाणी ओढे-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत.
माडग्याळ परिसरात मात्र तुरळक पाऊस झाला आहे. उमदी परिसरात विजापूर, चडचण व सोनलगी या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. या पावसामुळे शेतकऱ्यांतून काहीअंशी समाधान व्यक्त होत आहे.
जत पूर्व भागातील उमदी, हळ्ळी, बालगाव, बोर्गी, बेळोंडगी, सुसलाद, सोनलगी, मोरबगी, गिरगाव, करजगी आदी गावांत परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. काही गावात मध्यम आणि तुरळक स्वरूपाचा पाऊस पडला. ऐन बाजरी मळणी कालावधित जोरदार पाऊस झाल्याने काही भागात नुकसान झाले आहे.
या पावसामुळे विजयपूर, मंगळवेढा, सुसलाद, सोनलगी आणि विठ्ठलनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने रस्ता बंद होऊन वाहतुकीची कोंडी झाली होती.