खानापूर घाटमाथ्यावर दमदार पाऊस-अग्रणी नदीत पाणी : अनेक तलाव भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 08:29 PM2019-10-05T20:29:12+5:302019-10-05T20:30:25+5:30
गेली आठ-दहा वर्षे कसलाच पाऊस नसल्याने खानापूर घाटमाथा दुष्काळाने अक्षरश: होरपळत होता. गेली चार वर्षे टॅँकरशिवाय पाणी मिळत नव्हते. पाणीटंचाईने शेती उद्ध्वस्त झाली होती. पिण्याच्या पाण्यासाठी आटापिटा करावा लागत होता. यामुळे सर्वांचे लक्ष टेंभू योजनेच्या पाचव्या टप्प्याकडे व पावसाकडे लागले होते.
खानापूर : खानापूर घाटमाथ्यावर गेल्या महिन्यात दाखल झालेले टेंभूचे पाणी आणि गेल्या आठ-दहा दिवसांपासून पडत असलेल्या दमदार पावसामुळे ओढे, नाल्याबरोबर अग्रणी नदी वाहती झाली आहे. कायम दुष्काळी असणाऱ्या खानापूर घाटमाथ्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. खानापूर पाझर तलाव तसेच सुलतानगादे साठवण तलाव तुडुंब भरून वाहू लागल्याने आगामी काळात पाणीटंचाई जाणविणार नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
गेली आठ-दहा वर्षे कसलाच पाऊस नसल्याने खानापूर घाटमाथा दुष्काळाने अक्षरश: होरपळत होता. गेली चार वर्षे टॅँकरशिवाय पाणी मिळत नव्हते. पाणीटंचाईने शेती उद्ध्वस्त झाली होती. पिण्याच्या पाण्यासाठी आटापिटा करावा लागत होता. यामुळे सर्वांचे लक्ष टेंभू योजनेच्या पाचव्या टप्प्याकडे व पावसाकडे लागले होते.
अखेरीस एप्रिलमध्ये टेंभूच्या पाचव्या टप्प्या कार्यान्वित झाला. बलवडीच्या वितरण विहिरीतून टेंभूचे पाणी अग्रणी नदी दाखल झाले आणि नदी वाहती झाली. गेल्या महिन्यात खानापूरच्या पाझर तलावात टेंभूचे पाणी आले. तलाव भरला आणि पापनाशी ओढ्यातून पाणी सुलतानगादे साठवण तलावात दाखल झाले. सुलतानगादे साठवण तलाव टेंभूच्या पाण्याने भरणार तेवढ्यात परतीच्या पावसाने दमदार स्वरूपात हजेरी लावली आणि तलाव तुडुंब भरून वाहू लागला.
गेले आठवडाभर परतीचा पाऊस दमदार स्वरूपात हजेरी लावत आहे. दररोज पडणाºया पावसामुळे घाटमाथ्यावरील ओढे, नाले, अग्रणी नदी वाहू लागली आहे. सर्व बंधारे, तलाव तुडुंब भरले आहेत. विहिरी व कूपनिलकांच्या पाण्याची पातळी वाढू लागली आहे. यामुळे आगामी रब्बी हंगाम चांगला होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. येत्या द्राक्ष हंगाम चांगला होण्याची अपेक्षा आहे. बागायतदार आॅक्टोबर छाटणीसाठी तयारी करत आहेत. पावसामुळे खरीप हंगामाची दुर्दशा झाली आहे. शेतात पाणी साचून राहिल्याने पिके कुजू लागली आहेत.