बहुजनांची लोककला संपविण्याचा डाव
By Admin | Published: June 29, 2015 11:41 PM2015-06-29T23:41:06+5:302015-06-30T00:21:25+5:30
भारत पाटणकर : कवठेमहांकाळमध्ये महोत्सव
कवठेमहांकाळ : बहुजनांची लोककला संपविण्याचा विडा ब्राह्मणी व्यवस्थेने उचलला आहे. आता माणसे मारून आपली संस्कृती लादली जात आहे. हिसेंच्या विरोधात भीतीची संस्कृती संपविल्याशिवाय मुक्तीची गाणी गाण्यासाठी लोक पुढे येणार नाहीत. या चळवळीत अधिकाधिक कार्यकर्ते सहभागी व्हावेत. चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी प्रा. दादासाहेब ढेरे यांनी योगदान द्यावे, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत डॉ. भारत पाटणकर यांनी केले.
येथील राजर्षी शाहू विचार मंचतर्फे रविवारी आयोजित राजर्षी शाहू लोककला महोत्सव आणि प्रा. दादासाहेब ढेरे यांचा सत्कार, गौरव ग्रंथ प्रकाशन कार्यक्रमात डॉ. पाटणकर बोलत होते. ज्येष्ठ विचारवंत प्रा. बाबूराव गुरव अध्यक्षस्थानी होते.
डॉ. पाटणकर म्हणाले की, मोठे म्हणवून घेणारे संगीतकार आदिवासींच्या तांड्यापर्यंत गेले. तेथील चाली अणि रचना त्यांनी आणल्या. त्यामुळे ते मोठे झाले. दाभोलकर आणि पानसरेंचे मारेकरी सनातनी आहेत, यावर शिक्कामोर्तब झाले आहे; मात्र सरकार कारवाई करत नाही. सरकारवर दबाव आणण्यासाठी आता पुरोगाम्यांनी एक होऊन संघर्ष उभा केला पाहिजे. प्रा. दादासाहेब ढेरे यांचे कवठेमहांकाळच्या सामाजिक आणि पुरोगामी चळवळीतील योगदान मोलाचे आहे. भविष्यात त्यांनी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करावे.
आमदार सुमनताई पाटील म्हणाल्या की, प्रा. ढेरे यांनी आर. आर. आबांच्या बरोबरीने काम केले. आबांच्या आणि पुरोगामी विचारांची मशाल त्यांनी तेवत ठेवली आहे.
विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष पार्थ पोळके म्हणाले, डावी चळवळ कोणा जातीच्या विरोधात नाही. आमच्या पिढ्या ज्यांनी गारद केल्या, त्यांच्याशी ही लढाई आहे. आता न्याय, समतेच्या लढाईसाठी बहुजनांनी रस्त्यावर उतरावे. प्रा. दादासाहेब ढेरे म्हणाले, आता पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून बहुजनांच्या हक्कासाठी, न्याय, समतेसाठी रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली जाईल.
यावेळी प्राचार्य विश्वास सायनाकर, महांकाली कारखान्याचे अध्यक्ष विजय सगरे, बाबासाहेब वडगावकर यांचीही भाषणे झाली. डॉ. शिवपुत्र कोरे, प्रा. डॉ. सुवर्णा मोरे, प्रा. डॉ. मंगल लोंढे, दिग्विजय ढेरे आदी २१ गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. एकदिवसीय राजर्षी शाहू लोककला महोत्सव पार पडला. यामध्ये एल्गार कला मंच मुंबई, सांगलीचे लोकजागर कला मंच आणि कवठेमहांकाळ येथील गाणी बुद्ध भीमाची या पथकांनी ‘जलसा मानव मुक्तीचा’ हा शाहिरी आणि लोकगीतांचा कार्यक्रम सादर केला.
स्वागताध्यक्ष हायूम सावनूरकर यांनी प्रास्ताविक केले. बाळासाहेब रास्ते यांनी आभार मानले. सुरेशभाऊ पाटील, गजानन कोठावळे, माधवराव माने, गणपती सगरे, चंद्रकांत हाके, वैशाली पाटील, बाळासाहेब गुरव, दत्ताजीराव पाटील, बाळासाहेब कोठावळे, शिवाजी चंदनशिवे, दादासाहेब कोळेकर उपस्थित होते. अनिल म्हमाणे, बाळासाहेब रास्ते, रा. बा. सपकाळ, मुबारक मुल्ला आदींनी संयोजन केले. (वार्ताहर)