छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यावरून संघर्ष, जत शहरामध्ये छावणीचे स्वरुप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 12:40 PM2022-02-16T12:40:43+5:302022-02-16T12:41:39+5:30
पुतळा बसविण्यावरून आजी-माजी आमदारांमध्ये राजकीय जुगलबंदी
जत : जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शिवजयंतीपूर्वी बसवण्याची भूमिका समितीने घेतली आहे. तर सर्व कागदपत्रांची पूर्तता आणि परवाने मिळाल्याशिवाय पुतळा बसवता येणार नाही, असा पवित्रा प्रशासनाने घेतला आहे. पुतळा बसविण्यावरून आजी-माजी आमदारांमध्ये राजकीय जुगलबंदी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दक्षता घेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त जत शहरात मागविला आहे. त्यामुळे संपूर्ण शहराला सध्या पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.
जिल्ह्यांमधून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. राज्य राखीव दलाच्या मोठ्या सात- आठ वाहनांद्वारे राखीव पोलिसाला पाचारण केले आहे. त्यामुळे संपूर्ण शहराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. पोलिसांनी सकाळी मोठ्या प्रमाणात जत शहरामधून लाँगमार्च काढला. छत्रपती शिवरायांचा पुतळ्याचा प्रश्न मागील सोळा वर्षे रखडलेला आहे. अपघातानंतर सदरचा पुतळा व त्या ठिकाणचे बांधकाम पडल्यामुळे नवीन पुतळा बसविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
माजी आमदार विलासराव जगताप यांनी पुतळा समिती स्थापन करून छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा तयार करून घेतला आहे. सुमारे १८ लाख रुपये लोकवर्गणीतून गोळा करून हा पुतळा तयार केला होता. जयंती पूर्वी पुतळा बसणार अशी शक्यता होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत कोणीही कायदा हातात घेऊ नये, सर्व परवाने घेऊनच पुतळा बसवावा असे जाहीर केले आहे.
पुतळा जगतापांच्या पेट्रोल पंपाजवळ
पुतळा बसविण्यासाठी सर्व परवाने व त्याच्या मान्यता नसल्याने हा पुतळा बसू नये अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे मिरजेतून जतमध्ये पुतळा आणला आहे. बसविण्यासाठी सर्व परवाने व त्याच्या मान्यता नसल्याने हा पुतळा बसू नये अशी भूमिका प्रशासनाने घेत नोटीस पाठविल्या होत्या. सध्या हा पुतळा विलासराव जगताप यांचा पेट्रोल पंप असलेल्या विजापूर रस्त्यावर ठेवला आहे. त्याठिकाणी सकाळी व संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज मूर्तींची पूजा व आरती होत आहे.