टांग्यांच्या गावातच अस्तित्वासाठी टांगेवाल्यांची धडपड...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 11:02 PM2019-01-20T23:02:37+5:302019-01-21T12:07:27+5:30
सदानंद औंधे मिरज : प्रवासी वाहतुकीचे साधन म्हणून वापरण्यात येणारा टांगा इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात एकेकाळी मोठ्या संख्येने ...
सदानंद औंधे
मिरज : प्रवासी वाहतुकीचे साधन म्हणून वापरण्यात येणारा टांगा इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात एकेकाळी मोठ्या संख्येने टांगे असलेल्या मिरजेत आता केवळ १५ टांगे शिल्लक आहेत. प्रवासी भाडे मिळत नसल्याने टांग्यातून मालाची वाहतूक करण्यात येत आहे.
प्रवासी मिळत नसल्याने टांगाचालकांचा रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रवासी मिळत नसल्याने घोड्यास जगविणे कठीण झाले आहे. टांगा व्यवसाय करणाऱ्या बहुसंख्य अशिक्षित टांगाचालकांना हलाकीचे दिवस आले आहेत. दिवसभर भाड्याच्या प्रतीक्षेत असणारे टांगाचालक नाईलाजाने मालवाहतूक करीत आहेत. बांधकामाचे साहित्य टांग्यातून नेण्यात येत आहे. साहित्य टांग्यात चढविण्याचे व उतरविण्याचे काम टांगाचालक करीत आहेत.
पूर्वी टांग्याचा रुबाब होता; मात्र आता टांग्यात बसायला लाज वाटत असल्याने टांगा सर्वजण टाळत आहेत. टांग्याने जाण्यासाठी उशीर लागत असल्याने बस, वडाप किंवा रिक्षाने प्रवास सोयीस्कर ठरला आहे. बाल-गोपाळांची हौस व मनोरंजन म्हणून एखादा फेरफटका मारण्यासाठी आता टांग्याचा वापर होतो.
पेट्रोलची बचत व प्रदूषण नसलेला टांगा आता कोणीही वापरत नाही. चपळ, वेगवान व शिंगे नसल्याने गर्दीच्या ठिकाणी घातक नसणाºया देशी घोड्याचा टांग्यासाठी वापर होतो. घोडागाडी असणे हे एकेकाळी स्टेटस सिंबॉल होते. घोडागाडीचा प्रकार असलेली टांगा व बग्गी ही वाहने आपल्याकडे वापरात होती.
मिरजेत १९८० पर्यंत रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूस टांगा स्टॉप होता. किरण हॉटेलजवळ, देवल टॉकीजजवळ, मिशन हॉस्पिटलजवळ, दत्त चौकात, कृष्णाघाटावर, शास्त्री चौक, पोलीस चौकीजवळ असे मिरजेतल्या विविध भागात मोक्याच्या ठिकाणी, बाजारपेठेत टांगा स्टॉप होते.
रिक्षा व अन्य वाहने उपलब्ध झाल्यानंतर टांग्याचे महत्त्व कमी झाले. टांगा स्टॉपच्या जागेवर रिक्षा थांबे झाले. काही जागा फळविक्रेत्या, भाजीपाला विक्रेत्यांनी ताब्यात घेतल्या. आता मिरजेत किसान चौक टांगा व गांधी चौकातील टांगा स्टॉपवर केवळ १५ टांगे शिल्लक आहेत.
म्हातारपणी घोड्याला कसे सोडणार?
घोड्याचा खुराक व टांग्याचा देखभाल खर्च भागविण्यासाठी मालवाहतुकीशिवाय पर्यायच नाही. अन्य कोणताच व्यवसाय करण्याची उमेद आता राहिली नाही. आयुष्यभर साथ देणाºया घोड्याला म्हातारपणी सोडता येत नसल्याने, दररोज केवळ तीनशे ते चारशे रुपयात घोड्याचा व कुटुंबाचा खर्च चालवावा लागत असल्याचे, गेली ४० वर्षे टांगा व्यवसाय करणारे सलीम पठाण यांनी सांगितले.
टांगाचालकांची ओळखपत्रे ठाण्यात जमा
प्रवासी वाहतुकीसाठी पूर्वी टांग्याचेही वाहतूक नियमानुसार पासिंग केले जात होते. यासाठी टांग्यात कुशन गादी, रात्रीसाठी पुढे कंदील, दोन मोठ्या, तीन लहान आसनांची व्यवस्था करावी लागत असे. पाच प्रवाशांच्या वाहतुकीची परवानगी असलेल्या टांग्यास पुढील बाजूस पासिंगची माहिती असणारी लोखंडी पत्र्याची पट्टी असे.
टांगाचालकास ओळखपत्र म्हणून बिल्ला मिळायचा. टांग्याचे पासिंग थांबविल्यानंतर मिरजेत टांगाचालकांची ओळखपत्रे पोलीस ठाण्यात जमा केली. सध्या टांगा व्यवसायावर परिवहन विभागाचे नियंत्रण नाही.