विनाअनुदानित शाळांतील कर्मचाऱ्यांचा जगण्यासाठी संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:27 AM2021-01-23T04:27:20+5:302021-01-23T04:27:20+5:30
शिरढोण : कवठेमहांकाळ तालुक्यासह राज्यात कोरोनामुळे विनाअनुदानित शाळा आणि महाविद्यालयांमध्ये काम करणारे शिपाई, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सहायक, ग्रंथपाल, टेक्निशियन यांच्या ...
शिरढोण : कवठेमहांकाळ तालुक्यासह राज्यात कोरोनामुळे विनाअनुदानित शाळा आणि महाविद्यालयांमध्ये काम करणारे शिपाई, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सहायक, ग्रंथपाल, टेक्निशियन यांच्या नोकरीवर गदा आली आहे. सध्या ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याने विनाअनुदानित शाळांनी या कर्मचाऱ्यांना घरीच थांबण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शाळा बंदचा फटका विषय आणि कलाशिक्षकांनाही बसला असून, बहुतांश शाळांनी एप्रिल महिन्यापासून शिक्षकांना वेतन दिलेले नाही, तर काही शाळांनी शिक्षकांना कामावरून कमी केले आहे. या सर्व शिक्षण संस्थांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांचा आणि कर्मचाऱ्यांचा जगण्याचा संघर्ष लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतरही कायम राहिला आहे.
अनेक शाळांनी केवळ ऑनलाइन वर्ग सुरू असल्यामुळे शिक्षकांना अवघे ५० ते २५ टक्के वेतनच देऊ केले आहे. कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या अनेक शिक्षकांना पुन्हा व्याख्यान घेण्यासाठी न बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या नेट-सेटधारक शिक्षकांचे मानधन बंद केले आहे, तर काही ठिकाणी या शिक्षकांची सेवाच थांबविली आहे. गणित विषय शिकविण्यासाठी दोन शिक्षक असतील तर आता एकच शिक्षक ठेवण्यात आला आहे. याच शिक्षकाकडून सर्व वर्गांचे ऑनलाइन शिक्षण करून घेतले जात आहे. यामुळे एका शिक्षकाला एक वर्षासाठी कामावर येऊ नये असे सांगण्यात आले आहे. काही शाळांमध्ये क्रीडा व कलाशिक्षकांची नियुक्ती केली होती. या शिक्षकांनाही घरीच थांबण्यास सांगण्यात आले आहे.
चाैकट
सरकारने लक्ष देण्याची आपेक्षा
राज्यातील शिपाई, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सहायक, ग्रंथपाल, टेक्निशियन यांच्या नोकरीवर गदा येण्याची चिन्हे असल्याने या वर्गातून नाराजी दिसून येत आहे, परिपूर्ण शिक्षणासाठी प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सहायक ग्रंथपाल, टेक्निशियन, शिपाई हे महत्त्वाचे घटक आहेत, यांच्याशिवाय शैक्षणिक दालने अपूर्णच असल्याने सरकारने लक्ष घालण्याची मागणी या वर्गाकडून होत आहे.