सांगलीच्या उपनगरांत जगण्याचा संघर्ष कायम- मदत वाटपावेळी नागरिकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 12:24 AM2019-08-26T00:24:32+5:302019-08-26T00:37:30+5:30

या महापुराचा सर्वाधिक फटका शहरातील उपनगरांना बसला. दत्तनगर, काकानगर, सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, मगरमच्छ कॉलनी, शामरावनगर, इंद्रप्रस्थनगर, मीरा हौसिंग सोसायटी, कलानगर या उपनगरांतील पूर्ण घरेच पाण्याखाली गेली होती. तब्बल पावणेदोन लाख लोकांना महापुराचा फटका बसला.

The struggle to survive in the suburbs of Sangli continues | सांगलीच्या उपनगरांत जगण्याचा संघर्ष कायम- मदत वाटपावेळी नागरिकांची गर्दी

सांगलीतील सिद्धार्थ परिसरात रविवारी महापालिकेमार्फत जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपाचे काम सुरू असताना पूरग्रस्त नागरिकांची मदत मिळविण्यासाठी मोठी रांग लागली होती. साहित्य मिळविण्यासाठी त्यांना अनेक तास रांगेत उभे राहावे लागले.

Next
ठळक मुद्देजनजीवन पूर्वपदावर : घरांच्या ओल्या भिंतींना अजूनही कुबट वास

सांगली : महापुराच्या धक्क्यातून आता सांगली शहर हळूहळू सावरू लागले आहे. पुरामुळे नागरी वस्तीचे मोठे नुकसान झाले होते. विशेषत: उपनगरात राहणाऱ्या गोरगरीब जनतेला पुराचा मोठा दणका बसला होता. आता पंधरा दिवसांनंतर उपनगरांतील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. स्वच्छता, कचरा उठाव बºयापैकी झाला असला तरी, भिंती ओल्याच असल्याने घरात अजूनही दुर्गंधी आहे. काही भागात कचºयाचे ढीग रस्त्यावर पडून आहेत, तर काही ठिकाणी अपेक्षित औषध फवारणी झाली नसल्याच्या तक्रारी आहेत.

आॅगस्टच्या पहिल्याच आठवड्यात कृष्णा नदीला महापूर आला. २००५ च्या पुराचा अनुभव गाठीशी असलेल्या सांगलीकरांनी त्यानुसार नियोजन केले. पण शतकाला सर्वात मोठ्या महापुराला सामोरे जावे लागणार असल्याची पुसटशी कल्पनाही जनतेच्या मनात नव्हती. त्यात जिल्हा प्रशासनानेही पाण्याची पातळी किती वाढणार, याची माहिती जनतेला दिली नाही. केवळ वाहनांवर ध्वनिक्षेपक लावून, खबरदारी घ्या, असे सांगून हात झटकले होते. नेमकी काय खबरदारी घ्यायची, हे कळण्यापूर्वीच लोकांच्या दारात कृष्णामाई अवतरली. त्यामुळे जनतेचा मोठा गोंधळ उडाला. हजारो नागरिक पुरात अडकून पडले होते.

या महापुराचा सर्वाधिक फटका शहरातील उपनगरांना बसला. दत्तनगर, काकानगर, सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, मगरमच्छ कॉलनी, शामरावनगर, इंद्रप्रस्थनगर, मीरा हौसिंग सोसायटी, कलानगर या उपनगरांतील पूर्ण घरेच पाण्याखाली गेली होती. तब्बल पावणेदोन लाख लोकांना महापुराचा फटका बसला. त्यात उपनगरांतील लोकांची संख्या अधिक होती. महापूर ओसरल्यानंतर पूरग्रस्त लोक घरी परतले, पण घरादारासमोरचा चिखल, पुरात वाहून गेलेला संसार पाहून त्यांच्यासमोर अनेक प्रश्न उभे राहिले. चार ते पाच दिवसांच्या परिश्रमानंतर घरातील चिखल लोकांनी बाहेर काढला. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सारेच राबत होते. पंधरा दिवसानंतर आता कुठे उपनगरांतील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. दत्तनगर, काकानगर, मगरमच्छ कॉलनीत स्वच्छता झाली आहे. काही ठिकाणी कचºयाचे ढीग आहेत. दोन-तीनदा उपनगरांतील कचरा उचलला गेला. त्यानंतरही कचरा रस्त्यावर येतच आहे. कर्नाळ रस्त्यावरील शिवशंभो चौकात कचºयाचा ढीग आहे.

औषध फवारणीबाबत काही नागरिकांच्या तक्रारी दिसून आल्या. सुरूवातीच्या काळात एकदाच औषध फवारणी झाली. त्यानंतर आठ दिवसांनी फवारणी झाल्याचे सांगण्यात आले. शासनाची मदतही नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचली आहे. महापालिकेकडून कीट वाटप सुरू केले आहे. पण पुरामुळे घरातील ओलावा काही हटलेला नाही. घराच्या भिंती अजूनही ओल्याच आहेत. त्यामुळे घरात कुबट वास येत आहे. अजूनही काही घरात स्वच्छतेचे काम सुरूच असल्याचे चित्रही उपनगरांत दिसून येते. उपनगरांत मोलमजुरी करून जीवन जगणाऱ्यांची संख्या अधिक आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांचा रोजगार बुडाला आहे. त्यात शासनाने पाच हजाराची मदत केल्याने त्यांना थोडाफार हातभार लागला आहे. अजूनही अनेकजण मजुरीसाठी बाहेर पडलेले नाहीत.


मदत वाटपातही नेत्यांकडून श्रेयवाद
पूरग्रस्त उपनगरांत सध्या महापालिकेच्यावतीने साहित्याच्या कीटचे वाटप केले जात आहे. महापालिकेतील अधिकाºयांचे पथक उपनगरात जाऊन स्वत: कीट वाटत आहे. पण कीट वाटप करताना त्या भागातील लोकप्रतिनिधी मात्र वारंवार हस्तक्षेप करीत आहेत. त्यांच्यामुळेच मदत मिळत असल्याचे लोकांच्या मनावर बिंबविण्याचा केविलवाणा प्रयत्नही सुरू झाला आहे. रविवारी हरिपूर रस्त्यावर कीटचे वाटप करताना मोठा गोंधळ उडाला. ५०० हून अधिक लोक कीटसाठी रांगेत उभे होते. गोंधळामुळे अखेर आयुक्त नितीन कापडणीस यांना घटनास्थळी जावे लागले. त्यांनी लोकांची समजूत काढून, अजून कीट वाटली जाणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर जनतेचा संताप कमी झाला.

पूरग्रस्त शाळा : अजूनही बंदच
महापालिकेसह खासगी शाळांनाही पुराचा मोठा फटका बसला आहे. उपनगरांतील अनेक शाळा पाण्याखाली होत्या. या शाळा अजूनही सुरू झालेल्या नाहीत. सोमवारपासून त्या सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. मुलांचे शालेय साहित्यही पुरात खराब झाले आहे. या मुलांना महापालिकेच्यावतीने पुस्तके व शालेय साहित्य दिले जाणार आहे. पण शाळाच बंद असल्याने त्यांचे वाटपही पूर्णपणे होऊ शकलेले नाही. उपनगरांतील मुलांना मात्र आता शाळेची ओढ लागली आहे.


 

Web Title: The struggle to survive in the suburbs of Sangli continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.