इस्लामपुरातील पाटील भावकीत संघर्ष पेटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2022 01:35 PM2022-01-15T13:35:54+5:302022-01-15T13:36:19+5:30
ऊरुण परिसरातील पाटील भावकीतील नेत्यांचे इस्लामपूर पालिकेत वर्चस्व आहे
अशोक पाटील
इस्लामपूर : ऊरुण परिसरातील पाटील भावकीतील नेत्यांचे इस्लामपूर पालिकेत वर्चस्व आहे. भावकीतील लढती यापूर्वी रंगल्या आहेत. आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि विकास आघाडीकडून काहींनी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे या प्रभागात संघर्ष पेटणार आहे.
या प्रभागा ११ मधील विद्यमान अपक्ष नगरसेवक दादासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे तेच या प्रभागात राष्ट्रवादीचे उमेदवार असतील. त्यांच्याविरुद्ध विकास आघाडीचे अजित पाटील यांनी पुन्हा तयारी केली आहे. त्यात नव्याने डांगे गटाचे दिवंगत चंद्रकांत पाटील यांचे पुतणे सूरज पाटील हेही तयारीत आहेत. अनेकजण इच्छुक असल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे.
मागीलवेळी राष्ट्रवादीतून डांगे गटाचे चंद्रकांत पाटील उमेदवार होते. त्यांच्या विरोधात विकास आघाडीकडून अजित पाटील, तर विकास आघाडीकडून नाराज झालेल्या दादासाहेब पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. पाटील भावकीत कुरघोड्या झाल्या. त्यामुळे दादासाहेब पाटील यांना ‘लॉटरी’ लागली. त्यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने त्यांच्या गळ्यात उपनगराध्यक्ष पदाची माळ पडली.
या प्रभागात राजारामबापूंवर निष्ठा असणारे असंख्य कार्यकर्ते आहेत. त्यातील विमा कंपनीचे निवृत्त अधिकारी एम. जी. पाटील व त्यांच्या पत्नी रंजना पाटील राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत. परंतु आपण स्वीकृत नगरसेवक होणार, असे पाटील सांगतात. निवडणुकीआधीच त्यांनी एक पाऊल मागे घेतल्याची चर्चा आहे.
मागील दोन निवडणुकीपासून राजारामबापू बँकेचे अध्यक्ष शामराव पाटील यांच्या घरातील उमेदवाराची चर्चा होती. आताही त्यांचे पुत्र व राष्ट्रवादीचे खजिनदार शैलेश पाटील या प्रभागातून लढणार असे बोलले जाते. परंतु प्रा. पाटील यांनी हिरवा कंदिल दाखवलेला नाही. एकूणच भावकीतील संघर्षाची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे.
निवडणुकीबाबत शासनाचा निर्णय झालेला नाहीत. परंतु प्रभाग ११ मध्ये आमच्या गटाचे सूरज पाटील हे सुशिक्षित नेतृत्व आहे. त्यांच्या उमेदवारीबाबत सध्यातरी निर्णय झालेला नाही. निवडणूक येईल, त्यावेळी विचार केला जाईल. - ॲड. चिमण डांगे, माजी नगराध्यक्ष