सहायक आयुक्तांच्या गाडीवर दगडफेक : महापालिकेच्या कारवाईदरम्यान जमाव आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 12:45 AM2018-03-08T00:45:13+5:302018-03-08T00:45:13+5:30
कुपवाड : महापालिका प्रभाग समिती तीनच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून वानलेसवाडीतील संत बाळूमामा मंदिरासमोरील खुल्या भूखंडावरील सभामंडपाचे अतिक्रमण बुधवारी दुपारी काढण्यात आले. यावेळी अज्ञातांकडून सहायक आयुक्त जी. टी. भिसे यांच्या शासकीय वाहनावर दगड फेकून काच फोडण्यात आली.
संत बाळूमामा सेवाभावी संस्थेच्यावतीने वानलेसवाडीत खासगी एक गुंठा जागेवर बाळूमामा मंदिर बांधण्यात आले आहे. या सेवाभावी संस्थेकडून व परिसरातील भाविकांकडून गेली अनेक वर्षे विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमासाठी जागा कमी पडत असल्याने जवळच असणाºया महापालिकेच्या ताब्यातील चार गुंठे खुल्या भूखंडावर महाप्रसाद, पूजाअर्चासह विविध उपक्रम राबविण्यासाठी सभामंडप बांधण्यात आला होता.
या खुल्या भूखंडावर अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या मंडपाबाबत सुधार समितीच्या पदाधिकाºयांनी व इतर नागरिकांनी महापालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. महापालिकेने यापूर्वीही एकदा हे अतिक्रमण काढून घेण्याबाबत संबंधित पुजाºयांना नोटीस बजावली होती. तरीही अतिक्रमण काढून घेतले गेले नाही. याप्रकरणी कोणतीही कार्यवाही होत नसल्यामुळे महापालिकेचे सहायक आयुक्त जी. टी. भिसे, अतिक्रमण पथकप्रमुख दिलीप घोरपडे, अभियंता एन. डी. दळवी, अल्ताफ मकानदार, आदींच्या नेतृत्वाखालील पथकाने बुधवारी दुपारी बाळूमामा मंदिराच्या मंडपाचे अतिक्रमण जेसीबीच्या सहायाने काढून टाकले.
महापालिका पथकाकडून अचानक ही कारवाई करण्यात आली. यावेळी संतापलेल्या महिला भाविकांनी भिसे यांना घेराव घातला. तसेच अज्ञाताने भिसे यांच्या वाहनावर (एमएच १० एन ००२५) दगडफेक केली. यात गाडीची काच फुटली. यावेळी मंडपाची नासधूस झाल्यामुळे भाविक व अतिक्रमण पथकाचे अधिकारी यांच्यात जोरदार वादावादी झाली.या घटनेची रात्री उशिरापर्यंत विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.
नागरिकांची गर्दी
यावेळी विश्रामबाग पोलीस ठाण्याकडून बंदोबस्त मागविण्यात आला होता. अतिक्रमण हटाव कारवाईवेळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.