बेडग येथे एक विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:25 AM2021-03-21T04:25:43+5:302021-03-21T04:25:43+5:30
बेडग येथील कोरोनाबाधित विद्यार्थी राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यासाठी जाणार होता. स्पर्धेच्या नियमानुसार प्रथम त्याने आरटीपीसीआर चाचणी करून घेतली. ...
बेडग येथील कोरोनाबाधित विद्यार्थी राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यासाठी जाणार होता. स्पर्धेच्या नियमानुसार प्रथम त्याने आरटीपीसीआर चाचणी करून घेतली. चाचणीत या विद्यार्थ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे विद्यार्थ्याच्या संपर्कातील अन्य ३८ विद्यार्थ्यांचे स्वॅब बेडग आरोग्य उपकेंद्रात तपासणीसाठी घेण्यात आले. या सर्व विद्यार्थांना होम क्वारंटाईन करण्यात आले असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
विद्यार्थ्याच्या संपर्कातील ३८ जणांपैकी ३१ विद्यार्थ्यांचा रॅपिड टेस्ट अहवाल निगेटिव्ह आला आहे. इतर सात विद्यार्थ्यांमध्ये सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे दिसून येत असल्याने या सातजणांचे नमुने आरटीपीसीआर चाचणीसाठी पाठविण्यात आले असून, त्याचा अहवाल दोन दिवसांनी येणार आहे. शाळेतील इतर विद्यार्थ्यांना कोणतीही लक्षणे आढळल्यास त्यानी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. शालेय प्रशासनातर्फे शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांची बैठक घेऊन शनिवार, दि २० पासून १४ दिवसांसाठी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.