विद्यार्थी परिषद निवडणुका जाहीर झाल्याने लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 11:29 PM2019-08-01T23:29:50+5:302019-08-01T23:31:58+5:30
१६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. त्याचदिवशी सायंकाळी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे.
अविनाश कोळी ।
सांगली : तब्बल २५ वर्षांच्या खंडानंतर पुन्हा महाविद्यालयात विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका होत आहेत. यासाठी शिवाजी विद्यापीठाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून विद्यापीठाअंतर्गत २९४, तर जिल्ह्यातील ८९ महाविद्यालयांमध्ये २१ सप्टेंबरला मतदान व २३ सप्टेंबर रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे विद्यार्थी संघटना व इच्छुक विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे.
लोकशाही मार्गाने सार्वत्रिक मतदानाच्या माध्यमातून पुन्हा एकदा कॅम्पसवर विद्यार्थ्यांना नेतृत्व करण्यास वाव मिळावा, यासाठी या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमुळे विद्यार्थी संघटना, विद्यार्थी यांच्यात चैतन्य निर्माण झाले असून, महाविद्यालयात आता राजकीय वातावरण तापले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्रमानुसार ६ सप्टेंबररोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत महाविद्यालयांनी मतदारयाद्या प्रसिद्ध करावयाच्या आहेत. त्यानंतर ९ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत हरकती नोंदविण्यासाठी मुदत आहे. त्यानंतर त्याचदिवशी सायंकाळी ५ वाजता अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करायची आहे.
१३ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत महाविद्यालय आणि विद्यापीठ परिसरामध्ये अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी आणि आरक्षित संवर्ग प्रतिनिधींकरिता उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत राहणार आहे. त्याचदिवशी सायंकाळी ४ वाजेपर्यंत दाखल अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. त्यानंतर ४ वाजताच वैध उमेदवारी अर्जांची यादी प्रसिद्ध केली जाईल. १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. त्याचदिवशी सायंकाळी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे.
चार तास मतदानासाठी
२१ सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी २ या वेळेत मतदान होणार आहे. २३ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात होईल. त्यानंतर निकाल जाहीर होईल. यातून अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी व आरक्षित संवर्ग प्रतिनिधी निवडले जातील. त्यानंतर प्राचार्यांकडून एनएसएस, एनसीसी, क्रीडा, सांस्कृतिक या क्षेत्रांच्या चार प्रतिनिधींचे उमेदवार जाहीर केले जाणार आहेत.
असे होईल मतदान...
मतपत्रिकेवर आडनावाने सुरू होणारी उमेदवारांची नावे इंग्रजी वर्णानुक्रमाने नमूद करण्यात येतील.
वर्गप्रतिनिधी व विद्यापीठ विभाग विद्यार्थी परिषदेला किंवा महाविद्यालय विद्यार्थी परिषदेला निवडून द्यावयाचे अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी व राखीव प्रवर्गातील प्रतिनिधी यासाठी वेगळ्या मतपेट्या.
विद्यार्थ्याला एकूण कमाल पाच मते देण्याचा हक्क.
इंग्रजी किंवा मराठीत केवळ अंकात पसंतीक्रम.
निवडणूक सरळ बहुमताच्या तत्त्वानुसार.