पहिलीतील विद्यार्थिनीची शिक्षकाकडून लैंगिक छेडछाड, शिक्षक अटकेत; सांगलीतील घटना
By संतोष भिसे | Published: March 19, 2024 05:44 PM2024-03-19T17:44:39+5:302024-03-19T17:45:04+5:30
पालकांच्या उद्रेकानंतर बडतर्फीची कारवाई
सांगली : शहरातील एका खासगी इंग्रजी शाळेत पहिलीतील विद्यार्थिनीशी शिक्षकाने लैंगिक छेडछाड करण्याचा प्रकार घडला. विश्रामबाग पोलिसांनी संदीप पवार (रा. सांगली) या शिक्षकाला अटक केली असून त्याच्याविरोधात विनयभंग व लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
सोमवारी सकाळी अकरा ते साडेअकरा या वेळेत शिक्षकाने वर्गातच या मुलीशी गैरवर्तन केल्याची तक्रार आहे. याची माहिती मुलीने घरात सांगितल्यानंतर मोठ्या संख्येने पालक शाळेत एकत्र आले. प्राचार्यांकडे तक्रार केली. त्यानंतर पालक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनाही भेटले. प्राचार्य व पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांविरोधात पोलिसांत तक्रार देण्याची तयारी केली. यादरम्यान, मंगळवारी पालक स्वत:च विश्रामबाग पोलिस ठाण्यात गेले. तेथे मुलीच्या आईने तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
संदीप पवार हा २०१९ पासून या शाळेत शिक्षक म्हणून काम करतो. त्याच्याविरोधात अशा प्रकारच्या तक्रारी यापूर्वी कधीच नव्हत्या असे प्राचार्यांनी सांगितले. मात्र त्याने आजवर अनेक मुलींशी गैरवर्तन केल्याचा दावा पालकांनी केला. या घटनेमुळे मंगळवारी दुपारपर्यंत शाळेत पालकांनी एकच गर्दी केली होती. पोलिसांनी पवार याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. निरिक्षक ईश्वर ओमासे यांनी सांगितले की, पवारविरोधात मुलीच्या आईने तक्रार दिली असून त्याला ताब्यात घेतले आहे. त्याला संस्थेने सेवेतून सोमवारीच बडतर्फ केल्याची माहिती प्राचार्यांनी दिली. संस्थेनेही त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली.
दरम्यान, शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रतिष्ठित शाळेत असा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली. शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही असा प्रकार कसा घडला? असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला.