शाळेत कोंडला गेला विद्यार्थी
By Admin | Published: September 30, 2014 12:12 AM2014-09-30T00:12:53+5:302014-09-30T00:16:20+5:30
कुपवाडमधील घटना : अडीच तासानंतर सुटका
कुपवाड : शहरातील जिल्हा परिषद उर्दू शाळेत आज (सोमवारी) सायंकाळी चौथीच्या वर्गामध्ये शिक्षकांकडून चुकून पाचवीचा शाहीद शकील सय्यद (वय ११, रा. बामणोली जकात नाक्याजवळ, कुपवाड) हा विद्यार्थी कोंडला गेल्याची घटना उघडकीस आली. त्या विद्यार्थ्याने पावणेदोन तास शिक्षक व पालकांची वाट पाहून ओरडण्यास सुरुवात केल्यानंतर लगतच्या नागरिकांच्या लक्षात ही घटना आली. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने नागरिकांनी अडीच तासानंतर त्याची सुटका केली.
पाचवीच्या वर्गामध्ये संबंधित अडकलेला विद्यार्थी शाहीद सय्यद हा शिक्षण घेत आहे. सायंकाळी नेहमीप्रमाणे त्याचा वर्गही सुटला. परंतु, शिक्षकांनी त्याला शाळेतील खिडक्या बंद करावयास सांगितले. त्यावेळी तो विद्यार्थी ती खिडकी बंद करण्याचा प्रयत्न करीत असतानाच अचानकपणे बाहेरून कोणी तरी वर्गाचा दरवाजा बंद केला, असे शाहीदने सांगितले. अखेर त्याने आठ वाजण्याच्या सुमारास खिडकीतून ओरडण्यास सुरुवात केली. नागरिकांनी पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शाहीदची अडीच तासानंतर सुटका केली. (वार्ताहर)