अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड : प्रवेशातील गडबडीकडे शिक्षणाधिकाऱ्यांचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 12:08 AM2018-06-26T00:08:44+5:302018-06-26T00:09:06+5:30
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सोमवारी सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी प्रवेश अर्ज मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली होती.
सांगली : अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सोमवारी सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी प्रवेश अर्ज मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली होती. शहरातील प्रमुख कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश अर्ज घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्या होत्या. प्रवेश अर्ज देणे आणि स्वीकारण्याची मुदत २८ जूनपर्यंत असल्याने विद्यार्थ्यांना या कालावधित अर्ज जमा करावा लागणार आहे. दरम्यान, कनिष्ठ महाविद्यालयांकडून प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लूट होऊ नये यासाठी शिक्षणाधिकारी महेश चोथे यांचे बारीक लक्ष आहे.
जिल्ह्यातील २३८ कनिष्ठ महाविद्यालये आणि उच्च माध्यमिक शाळेमध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी ठराविकच महाविद्यालयांमध्ये प्रवेश अर्ज घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. जिल्ह्यात कला, वाणिज्य, विज्ञान, कौशल्य व इतर माध्यमांची ४७ हजार ५२० इतकी प्रवेश क्षमता आहे. यावर्षी जिल्ह्याचा दहावीचा निकाला ९२.२५ टक्के इतका लागून ३८ हजार ४७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे सुमारे हजार दहा जागा रिक्त राहणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रवेशाच्या नियोजनासाठी नुकतीच माध्यमिक शिक्षणाधिकारी महेश चोथे यांनी जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य आणि उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक यांची बैठक घेऊन याबाबतच्या सर्व सूचना दिलेल्या आहेत.
अर्ज घेण्याच्या पहिल्या दिवशी सांगली शहरातील बहुतांश महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी होती. कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, कन्या पुरोहित, जी. ए. कॉलेज आॅफ कॉमर्स, मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, विलिंग्डन, चिंतामणराव वाणिज्य, डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगलीवाडी, राणी सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयात माहितीपत्रक मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू होती. पन्नास ते शंभर रुपयांना माहितीपुस्तिका कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध आहे. विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा अधिक ओढा असल्याचे दिसून आले. नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची सुरुवातीपासून चढाओढ राहणार असल्याचे संकेत आहेत.
अकरावी प्रवेश प्रक्रिया कार्यक्रम...
प्रवेश अर्ज देणे व स्वीकारणे : दि. २५ ते २८ जून
अर्ज छाननी, गुणवत्तेनुसार निवड यादी : दि. २९ जून ते २ जुलै
निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिध्द : दि. ३ जुलै
निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश : दि. ४ ते ७ जुलै
प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी प्रवेश : दि. ९ ते १० जुलै
दुसºया यादीतील विद्यार्थी प्रवेश : दि. ११ ते १२ जुलै
एटीकेटी विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया : दि. १३ ते १४ जुलै
अकरावी वर्ग चालू : दि. १६ जुलै