नाटोलीत गुरुजींच्या बदलीने विद्यार्थी धाय मोकलून रडले, व्हिडिओ व्हायरल :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 03:04 PM2019-09-24T15:04:57+5:302019-09-24T15:07:31+5:30
विद्यार्थीप्रिय शिक्षक कसे असावेत, याचा अनुभव शिराळा तालुक्यातील नाटोली गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत नुकताच आला. या शाळेचे वरिष्ठ शिक्षक वसंत शंकर कुंभार (रा. मांगले, ता. शिराळा) यांची कांदे येथील प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून नुकतीच बढतीवर बदली झाली. याची माहिती मिळाल्यानंतर वर्गातील सर्व विद्यार्थी धायमोकलून रडले. निरोप देताना गाडीमागून चक्क पाठलाग केला, त्यांची गाडी अडवली. अंगावर शहारे आणणारा हा प्रसंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मांगले : विद्यार्थीप्रिय शिक्षक कसे असावेत, याचा अनुभव शिराळा तालुक्यातील नाटोली गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत नुकताच आला. या शाळेचे वरिष्ठ शिक्षक वसंत शंकर कुंभार (रा. मांगले, ता. शिराळा) यांची कांदे येथील प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून नुकतीच बढतीवर बदली झाली. याची माहिती मिळाल्यानंतर वर्गातील सर्व विद्यार्थी धायमोकलून रडले. निरोप देताना गाडीमागून चक्क पाठलाग केला, त्यांची गाडी अडवली. अंगावर शहारे आणणारा हा प्रसंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वसंत कुंभार गुरुजी गेल्या सात वर्षांपासून नाटोली येथील प्राथमिक शाळेत सेवा बजावत होते. नुकतीच त्यांना मुख्याध्यापक म्हणून बढती मिळाली. निरोपासाठी ते शाळेत पोहोचले. ही वार्ता अगोदरच विद्यार्थ्यांना समजली होती. गुरुजींना पाहताच विद्यार्थी रडू लागले. गुरुजींनाही अश्रू अनावर झाले. या प्रसंगातून सावरून त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांचा आणि सहकारी शिक्षकांचा निरोप घेऊन ते कांदे प्राथमिक शाळेत हजर होण्यासाठी नाटोली शाळेतून निघाले, मात्र गुरुजी बाहेर पडताच विद्यार्थ्यांनी धायमोकलून रडण्यात सुरुवात केली. मोटारसायकलपर्यंत त्यांना सोडण्यासाठी आलेले शिक्षक मागे वळून पाहतात, तर पन्नासहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी रडतच बाहेर धावले. शाळेसमोर भावूक वातावरण निर्माण झाले. गुरुजी, तुम्ही परत या अशा हाका मारत मुलांनी टाहो फोडला. त्यावेळी उपस्थित शिक्षकही भावनावश झाले.
गेली सात वर्षे प्रामाणिकपणे अध्यापनाचे काम करणाऱ्या वसंत कुंभार यांना त्यांच्या कामाची पोहोचपावती मुलांनी दिली. नवीन शिक्षक येणार, बदली होणार, हे जरी अटळ असले, तरी शैक्षणिक उठाव, अध्यापनाची हातोटी, यामुळे वसंत कुंभार विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून नाटोली शाळेत काम करत होते.
गुरुजींना निरोप देताना शाळेतील सर्व विद्यार्थी यावेळी धायमोकलून रडत होते. त्यातच गुरुजींनी थरथरत्या पायांनी मोटारसायकलला किक मारली. काही विद्यार्थी त्यांच्या गाडीचा पाठलाग करून ह्यसर आम्हीही तुमच्याबरोबर येतोह्ण, म्हणून टाहो फोडू लागले. रस्त्यात थांबून गुरुजींनी त्यांची समजूत काढली. ह्यलगेच जाऊन परत येतोह्ण असे सांगत पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांनी कांदे मराठी शाळेत हजेरी लावली. इकडे इतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांची समजूत काढून वर्गात आणले. शनिवारी नाटोली शाळेतून कुंभार गुरुजींनी निरोप घेतला, मात्र सोमवारीही विद्यार्थ्यांनी शाळेत त्यांनी फळ्यावर लिहिलेले गणित पुसू दिले नाही.
मी जाईल त्या ठिकाणी प्रामाणिक आणि सचोटीने काम केले. विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम, त्यांच्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन, त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिली. अधिक वेळ देऊन त्यांच्याकडून अभ्यास करून घेतला. हीच माझी हातोटी विद्यार्थ्यांना भावली. शिवाय यासाठी मी मुख्याध्यापकपदाची बढती नाकारण्याचाही विचार केला होता.
- वसंत कुंभार,
वरिष्ठ शिक्षक