‘डिप्लोमा’साठी मिळेनात विद्यार्थी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 04:23 PM2019-07-05T16:23:35+5:302019-07-05T16:25:33+5:30
दहावीच्या निकालानंतर अकरावीसह इतर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असली तरी, यंदा विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण घटल्याने,
सांगली : दहावीच्या निकालानंतर अकरावीसह इतर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असली तरी, यंदा विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण घटल्याने, त्याचा सर्वच प्रवेश प्रक्रियेवर परिणाम होणार आहे. त्यातच दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांसह पालकांचाही आयटीआयकडे ओढा वाढल्याने अभियांत्रिकीच्या पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी मिळविताना अनेक महाविद्यालयांची कसरत होणार आहे.
गेल्या काही वर्षांपर्यंत दहावीनंतर अभियांत्रिकीमधील पदविका अभ्यासक्रमाला प्राधान्य दिले जात होते. पदविकेनंतर पदवीला थेट दुसºया वर्षात मिळणारा प्रवेश आणि अनुभवामुळे पदविका अभ्यासक्रमाला विद्यार्थी मिळत होते. आता मात्र, परिस्थिती बदलली असून पदविका अभ्यासक्रमानंतर विद्यार्थ्यांचा पदवीकडे ओढा असल्याने अनेकजण बारावीनंतरच प्रवेश घेण्यास प्राधान्य देत आहेत.
यंदा जिल्ह्यातील ११ हजारावर अकरावीच्या जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. एकीकडे अकरावीच्या इतक्या मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त राहणार असल्याने पदविकेसाठी विद्यार्थी मिळण्यास अडचणी येण्याची चिन्हे आहेत. अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, पदविका अभ्यासक्रमावर चांगल्या पगाराची नोकरी लागू शकते. तरीही पालकांची मानसिकता बदलत आहे. मुलाने बारावीनंतर अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यावे यासाठीची मानसिकता पालकांकडून वाढत आहे. त्यामुळे नोकरीच्या चांगल्या संधी असतानाही विद्यार्थी कमी असल्याने जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची वानवा आहे.
पदविका केल्यानंतर पदवीला प्रवेश घेणे हा एकमेवच पर्याय आहे. अभ्यासक्रम कालबाह्य बनत चालल्याने पदवी अभ्यासक्रमावेळी विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी पदविकेतून पदवीला कोटा २० टक्क्यांचा होता, तो १० टक्क्यांवर आला आहे.