मिरजेच्या विद्यार्थी थिएटर्सने जिंकली रसिकांची मने

By admin | Published: March 7, 2017 11:11 PM2017-03-07T23:11:12+5:302017-03-07T23:11:12+5:30

नाटकाची व्यथा मांडणारे ‘सस्ती गंमत’ : कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा उपक्रम, रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

The students of Mirza's students won the hearts of the devotees | मिरजेच्या विद्यार्थी थिएटर्सने जिंकली रसिकांची मने

मिरजेच्या विद्यार्थी थिएटर्सने जिंकली रसिकांची मने

Next

सांगली : ठराविक चौकटीत अडकलेल्या रंगभूमीला नव्या वळणावर नेत मिरजेच्या विद्यार्थी थिएटर्सच्या ‘सस्ती गंमत’ या प्रायोगिक नाटकाने नाशिकमधील रसिकांची मने जिंकली. नाटकाला लोककलेच्या माध्यमातून मुक्त करण्यासाठी केलेला संघर्ष विनोदी अंगाने या नाटकात मांडल्याने उपस्थितांनीही उत्स्फूर्त दाद दिली.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या कुसुमाग्रज स्मरण उपक्रमांतर्गत मिरजेतील विद्यार्थी थिएटर्सच्या कलाकारांनी नाशिक येथे हे नाटक सादर केले.
सिद्धहस्त आणि प्रयोगशील लेखक दिलीप जगताप यांनी त्याच त्या विषयांच्या पलीकडे जाऊन रंगभूमीचे वैभव खुलविणाऱ्या ‘सस्ती गंमत’मधून नाट्यसृष्टीतील भंपकपणा मांडला आहे. अनिकेत ढाले यांनी दिग्दर्शन केले. सर्वसामान्यांना नाटक समजले म्हणजे ते हीन दर्जाचे होत नाही आणि अत्यंत जड भाषा वापरून सादर केलेले नाटक अत्युच्च दर्जाचे होतेच असेही नाही. रंगभूमीवरील या विसंगतीवर जगताप यांनी नेमके बोट ठेवले आहे.
कोणताही सेट नाही, जास्त तांत्रिक साधने नाहीत. केवळ अभिनय आणि जोमदार कथानक यांच्या साहाय्याने तरूण मुलांनी हे नाटक सादर केले. उच्चभ्रू समाजाने कडी-कोयंड्यात डांबलेली ही कला लोककलाकारांनी कशी समाजापुढे खुली केली, हे या नाटकातून सांगण्याचा कलाकारांनी प्रयत्न केला आहे. संगीताचाही अत्यंत कमी पण नेमकेपणाने वापर या नाटकात केला आहे. गण, गौळण, बतावणी, लावणी या अंगाने नाटकाचे कथानक जाते. विशिष्ट कथानक नसले तरी, नाटक फुलविण्यात दिग्दर्शकाचे कसब दिसते. यामुळेच दर्शकांना नाटक भावते.
या नाटकात ओंकारसिंग रजपूत (आबू), सूरज कांबळे (बाबू), प्रतीक धुळूबुळू (राजा), प्रणिता भिंताडे (हंसा), मानसी बरगाले (नटी), मीनाक्षी बरगाले (राणी), शीतल धुळूबुळू (गांधारी), सदानंद सावकर (धृतराष्ट्र), रोहन कदम (बाबा), स्वरूप पाटील (भावड्या), कुणाल (संस्कृती रक्षक) यांनी आपापल्या भूमिका चोखपणे बजावल्या आहेत. प्रकाश योजना वैभव बडवे यांची, पार्श्वसंगीत अतिष कांबळे यांची, तर रंगमंच व्यवस्था चेतन देशिंगकर यांची होती.
मार्चच्या शेवटच्या आठवड्यात नॅशनल बुक ट्रस्टने कोल्हापुरात, तर दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेने २६ मार्चला इचलकरंजीत आणि शब्द प्रकाशनने एप्रिलमध्ये मुंबईत या नाटकाचे प्रयोग आयोजित केले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The students of Mirza's students won the hearts of the devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.