विट्यामध्ये विद्यार्थ्यांचा मोचा
By admin | Published: December 12, 2014 10:54 PM2014-12-12T22:54:02+5:302014-12-12T23:33:47+5:30
विविध मागण्या : नकारात्मक गुणपद्धती रद्द कर्रा
विटा : औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांना सुरू केलेली नकारात्मक गुणपध्दती रद्द करावी, प्रश्नपत्रिका मराठीतून करावी, विटा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात पूर्णवेळ प्राचार्यांची नियुक्ती करावी, सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश द्यावा यांसह अन्य मागण्यांसाठी आज, शुक्रवारी विटा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांनी विटा तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व स्टुडंटस् फेडरेशन आॅफ इंडियाचे जिल्हा संघटक राजेंद्र वाटकर, एस. पाटकुळकर व उमेश देशमुख यांनी केले.
औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांना नकारात्मक गुणपध्दती सुरू केली आहे. ही पध्दत सुरू करताना संपूर्ण परीक्षेचीच रचना बदलली आहे. परिणामी, विद्यार्थी अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढले आहे. सांगली जिल्ह्यात आय. टी. आय. परीक्षेचा निकाल २० टक्के लागला आहे. त्यामुळे ८० टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आज, शुक्रवारी विटा तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.
विटा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रापासून सकाळी ११ वाजता या मोर्चास सुरूवात झाली. हा मोर्चा चौंडेश्वरी चौक, शिवाजी चौकातून तहसील कार्यालयावर गेला. त्यावेळी प्रभारी तहसीलदार चंद्रकांत महाजन यांना आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या मोर्च्यात नीतेश कदम, कल्याणी घोडके, गणेश सातपुते, आकाश सूर्यवंशी, प्रणिता खरात यांच्यासह विटा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील सुमारे १५० ते २०० विद्यार्थी सहभागी झाले होते. (वार्ताहर)