यापुढे विद्यार्थ्यांना जातीचे दाखले शाळेतच : जयंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 05:37 PM2020-02-14T17:37:44+5:302020-02-14T17:38:35+5:30
सांगली जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्याना जातीचा दाखला आणि गावकऱ्यांना शिधापत्रिका वितरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येणार असून विद्यार्थ्यांना शाळेतच जातीचे दाखले उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज येथे दिली.
सांगली : जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्याना जातीचा दाखला आणि गावकऱ्यांना शिधापत्रिका वितरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येणार असून विद्यार्थ्यांना शाळेतच जातीचे दाखले उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज येथे दिली.
महाराजस्व अभियान अंतर्गत वाळवा तालुक्यातील बहे येथे बहे, कुबालवाडी आणि खरातवाडी गावातील शालेय विद्यार्थ्यांना जातीचे दाखले व शिधापत्रिका वितरण पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले, याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमास पंचायत समितीच्या सभापती अश्विनी पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, उपविभागीय अधिकारी नागेश पाटील, तहसिलदार रवींद्र सबनीस, गट विकास अधिकारी शशिकांत शिंदे, बहेच्या सरपंच छायाताई पाटील, खरातवाडीचे सरपंच पृथ्वीराज खरात, कुबालवाडीचे सरपंच चांगदेव कांबळे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जातीचा दाखला आणि शिधापत्रिका महत्वाचा दस्तऐवज असून ती विनासायास उपलब्ध झाली पाहिजेत. यासाठी जिल्ह्यात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्याना शाळेतच जातीचे दाखले आणि गावकऱ्यांना शिधापत्रिका गावातच उपलब्ध झाल्यास ती मिळविण्यासाठी होणारा त्रास कमी होईल.
सामान्य माणसाची कामे सहजगतीने व्हावीत, त्याला शासकीय योजनांचा लाभ घेता यावा आणि सामान्य माणसाला सेवा देण्यासाठी प्रशासन गावात जाऊन ही मोहीम राबविणार असल्याचे पालकमंत्री पाटील म्हणाले. विद्यार्थ्यांना जातीचा दाखला दिल्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी काय करावे लागेल यासाठी संबंधित विभागाशी चर्चा केली जाईल.
पालकमंत्री म्हणाले, पाणंद रस्ते हा महत्वाचा प्रश्न असून जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद रस्त्याचा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. पाणंद रस्ते नसल्यामुळे शेतकऱ्यांना अडचण निर्माण होत असून पुरामुळे अनेक ठिकाणचे पाणंद रस्ते खराब झाले असल्याने पाणंद रस्त्याच्या कार्यक्रमास प्राधान्य देण्यात येणार आहे.
तहसलिदार रवींद्र सबनीस यांनी स्वागत केले व प्रास्ताविकात उपक्रमाची माहिती दिली. ते म्हणाले, बहे मंडल मधील बहे, कुबालवाडी व खरातवाडी या गावातील 904 विद्यार्थ्याना जातीचे दाखले व 250 कुटुंबाना शिधपत्रिकेचे वितरण करण्यात येणार आहे.
या उपक्रमातून जुनी-खराब रेशनकार्डही बदलून दिली जाणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी पंचायत समिती सभापती अश्विनी पाटील, विठ्ठल पाटील, माणिक पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कृषि विभागाकडील योजनांचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना लाभ मंजुरीचे पत्र, घरकुल योजनेच्या लाभार्थीना धनादेशाचे वितरण पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.