Sangli: कौतुकास्पद! उन्हाळ्याच्या सुटीत विद्यार्थ्यांनी फुलवली सुमारे दहा एकर परिसरात वनराई
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 01:22 PM2023-06-01T13:22:50+5:302023-06-01T13:28:08+5:30
सांगलीतील कुलाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत पाच वर्षांपासून राबविला जातोय राजमाता अहिल्यादेवी वनराई वृक्ष संवर्धन उपक्रम
अनिता पाटील
दरीबडची : उन्हाळी सुटीत कुलाळवाडी (ता. जत) येथील जिल्हा परिषद शाळेचा परिसर आणि खंडोबा-बिरोबा देवस्थान परिसरातील झाडांची देखभाल, संवर्धन शाळेतील विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने करीत आहेत.
कुलाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत पाच वर्षांपासून विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ व वृक्षप्रेमींच्या सहकार्याने राजमाता अहिल्यादेवी वनराई वृक्ष संवर्धन उपक्रम राबविला आहे. यातून पर्यावरण रक्षण व भावी पिढीला पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगणे, असा दुहेरी हेतू साध्य झाला आहे.
शाळा परिसर, गावठाण, खंडोबा व बिरोबा देवस्थानच्या सुमारे दहा एकर परिसरावर, घरांच्या सभोवताली, शेतांच्या बांधावर ४२६८ झाडांचे जतन व संवर्धन केले आहे. ग्रामस्थांच्या मदतीने व श्रमदानातून सुमारे दोन हजार फूट पीव्हीसी व पाच हजार फुटाहून अधिक भूमिगत ठिबक सिंचन पाइपलाइन केली आहे. पालापाचोळा गोळा करून त्याचे मल्चिंग केले आहे. झाडांभोवती तारेचे कुंपण उभारले आहे.
अमेरिका, इंग्लंड ऑस्ट्रेलियातून मदत
पर्यावरणपूरक उपक्रमासाठी अमेरिकेतून सचिन मिरजकर, अभिजित मिरजकर, प्रमोद मंद्रे, सचिन ढमढेरे, संतोष महाजन, आशिष गोर, देवेंद्र सायखेडकर, युथ फॉर जत संस्थेचे अजय पवार (इंग्लंड), प्रमोद मांडरे, आशिष गोर, जोशिल अविक्कल, सिद्धार्थ कुंडलकर, सईद इरफान पाशा, अतुल टेंबे, ऑस्ट्रेलियातून हिमांशू ठाकूर, संजय वाखरे यांनी मदत केली.
सध्या उन्हाळी सुटी आहे. विद्यार्थ्यांना वृक्षाबद्दल आस्था आहे. त्यामुळे वृक्षसंगोपन चांगल्या पद्धतीने सुरू आहे. यापूर्वी राबविलेले उपक्रम शाश्वत स्वरूपात टिकवून ठेवण्याचे प्रयत्न आहेत. - भक्तराज गर्जे, शिक्षक