विद्यार्थीदशेतील वाचन आयुष्याची शिदोरी
By admin | Published: July 13, 2017 12:06 AM2017-07-13T00:06:35+5:302017-07-13T00:06:35+5:30
राजवर्धन पाटील : ‘जयंत वाचन स्पर्धा २०१७’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे प्रबोधन
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : आपण विद्यार्थीदशेत जे-जे चांगले वाचाल, त्यातून तुम्हाला आयुष्याची शिदोरी मिळेल़ चांगली पुस्तके व माणसे आपला गुरू असून, त्यांच्यामुळे जीवनाला निश्चित दिशा मिळते, असा विश्वास माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील यांनी व्यक्त केला. आपणही शालेय जीवनात फारसे अवांतर वाचन करू शकलो नाही़; मात्र पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेल्यानंतर मला अवांतर वाचनाची आवश्यकता जाणवली, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राजवर्धन पाटील फौंडेशन बालहक्क संरक्षण मंचच्या माध्यमातून वाचन संस्कृती वाढविण्यासाठी वाळवा तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या ‘जयंत वाचन स्पर्धा २०१७’ या उपक्रमांतर्गत त्यांनी शहरातील विविध शाळांना भेट देऊन मार्गदर्शन केले. दिवसभरात त्यांनी विद्यामंदिर, सद्गुरू आश्रमशाळा, यशवंत, जि. प. शाळा क्ऱ १ व साखराळे येथील मॉडर्न हायस्कूलमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींशी संवाद साधून स्पर्धेची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.
अॅड़ धैर्यशिला पाटील, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, सद्गुरू आश्रमशाळेचे सत्यजित जाधव, मुख्याध्यापक आऱ आऱ बडवे, डी़ टी़ पाटील, सौ़ ए़ ई़ मुळे, राजवर्धन पाटील फौंडेशनचे अध्यक्ष रणजित तेवरे, सचिन पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
राजवर्धन पाटील म्हणाले, ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत, जीवनात उज्ज्वल यश मिळविले, अशा महापुरुषांची चरित्रे तुम्ही वाचली, तर त्यांचे अनुभव तुम्हाला जीवनभर मार्गदर्शक ठरू शकतात़ मी ७ वी, ८ वी ला असताना हॅरी पॉटरचे काही भाग वाचले़ त्यानंतर चित्रपट आल्यामुळे पुढचे भाग वाचायचे राहिले़ मात्र चित्रपट पाहतानाही आपण हे कुठेतरी पूर्वी पाहिले आहे, असेच वाटले़ सध्या मी बॅँकेतील नोकरी करताना फुटबॉल खेळणे, जिमबरोबर वाचनावर भर दिला आहे़
अॅड़ धैर्यशिला पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी एकनाथ मुळे, रजनीकांत बल्लाळ, श्रीमती एम. आय़ तांबोळी, एस़ ए़ पाटील, बी़ ए़ भोसले, आऱ एस़ मदने, व्ही़ एस़ मोरे, आनंदराव पाटील, फौंडेशनचे संकेत गिरीगोसावी, सूरज कचरे, यासिन शेख, सूरज पाटील, विशाल राठोड, रोहित पवार, प्रज्ज्वल दळवी, सूरज कुशिरे, योगेश लोखंडे, निहाल तांबोळी, वैभव गुजर, रोहित कदम यांच्यासह कार्यकर्त्यांनी संयोजन केले़ यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी आदी उपस्थित होते.
आजीचे अजून वाचन
यावेळी राजवर्धन पाटील म्हणाले, माझी आजी ९४ व्या वर्षी बराक ओबामा वाचत असताना, आम्हाला आश्चर्य वाटले़ अमेरिकेसारख्या महासत्तेच्या अध्यक्षस्थानापर्यंत पोहोचताना ओबामांनी काय संघर्ष केला, हे या पुस्तक वाचनातून कळले, असे त्यांनी सांगितले़ वाचनासाठी कोणतेही वय नाही. नेहमी वाचत राहिले पाहिजे. त्यामुळे अनेक प्रश्नांची आपणाला उत्तरे मिळतात.