‘फी’साठी विद्यार्थ्यांना शाळेतून हाकलले

By admin | Published: February 10, 2016 01:03 AM2016-02-10T01:03:43+5:302016-02-10T01:08:50+5:30

सांगलीतील घटना : संस्थापकावर गुन्हा दाखल

The students from the school for 'fee' were released | ‘फी’साठी विद्यार्थ्यांना शाळेतून हाकलले

‘फी’साठी विद्यार्थ्यांना शाळेतून हाकलले

Next

सांगली : अनुसूचित जातीच्या आरक्षणावर दोघा सख्ख्या भावांना प्रवेश मिळूनही त्यांच्या फीमध्ये सवलत न देता, फी भरली नसल्याच्या कारणावरुन त्यांना शाळेतून बाहेर काढून पालकांना दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला. जागृती शिक्षण संस्थेच्या विश्रामबाग येथील वारणालीतील सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी संस्थेचे संस्थापक बाळासाहेब जे. पाटील (रा. सांगली) यांच्याविद्ध संजयनगर पोलीस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ (अ‍ॅट्रॉसिटी) केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विजयनगर येथील दीडशे फूट रस्त्यावर राहणारे संतोष वसंत भंडारे यांनी फिर्याद दिली आहे. त्यांना संकेत (वय १०) व दर्शन (८) ही दोन मुले आहेत. मुलांना त्यांनी अनुसूचित जातीच्या आरक्षणावर सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश घेतला होता. संकेत चौथीत, तर दर्शन दुसरीत शिकतो. आरक्षणाच्या मुद्यावर भंडारे यांच्या दोन्ही मुलांना शाळेच्या फीमध्ये २५ टक्के सवलत मिळणार होती. तरीही संस्थेने त्यांना फीमध्ये सवलत दिली नाही. भंडारे यांनी संस्थेकडे माहितीच्या अधिकाराखाली अनुसूचित जातीच्या आरक्षणावर फीमध्ये किती टक्के सवलत दिली जाते? किती विद्यार्थ्यांना आरक्षणावर प्रवेश दिला आहे? माझ्या दोन्ही मुलांची अजून किती फी भरायची आहे? या तीन प्रश्नांवर माहिती मागविली होती. पण संस्थेने त्यांना कोणतीही माहिती दिली नाही. त्यानंतर फी भरली नाही, म्हणून त्यांच्या मुलांना शाळेतून बाहेर काढले होते. भंडारे यांनी यासंदर्भात शाळेकडे विचारणा केली, त्यावेळी शाळेने त्यांना जातीचा दाखला देण्याची मागणी केली. जातीचा दाखला दिल्यानंतर मुलांना पुन्हा शाळेत बसविले.
आठवड्यापूर्वी भंडारे यांना संस्थेचे संस्थापक बाळासाहेब पाटील यांनी भंडारे यांना बोलावून घेतले. त्यांना एक अर्ज देऊन त्यावर सही करण्यास सांगितले. भंडारे यांनी अर्ज वाचल्यानंतर त्यामध्ये शासनाच्या अनुसूचित जातीच्या आरक्षणावर फीमध्ये सवलत घेतली असल्याचे म्हटले होते. भंडारे यांनी पाटील यांना ‘आम्हाला कोणतीही सवलत मिळाली नाही, त्यामुळे मी सही करणार नाही’, असे सांगितले. यावर पाटील यांनी, ‘तुमच्यासारख्या लोकांमुळे शाळेचा दर्जा खालावला आहे’, असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करुन, मुलांना शाळेतून घेऊन जा, असे सांगितले. (प्रतिनिधी)

उपअधीक्षकांकडे तपास
शासनाच्या सवलतींचा लाभ मिळत असतानाही संस्थेने विद्यार्थ्यांना दिला नाही. त्यानंतर पालकांना दमदाटी व विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर काढल्याचा प्रकार शहरात प्रथमच घडला आहे. पोलिसांनीही तातडीने गुन्हा दाखल करून घेतला. याचा तपास पोलीस उपअधीक्षकांकडे सोपविला जाणार आहे.

Web Title: The students from the school for 'fee' were released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.