अभ्यासाच्या ताणामुळे विद्यार्थिनीची आत्महत्या
By admin | Published: January 4, 2015 12:53 AM2015-01-04T00:53:14+5:302015-01-04T00:57:33+5:30
सांगलीतील घटना : गळफास घेतला
सांगली : बारावीची परीक्षा जवळ आल्याने अभ्यासाच्या ताणामुळे सांगलीतील गवळी गल्लीतील विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. निकिता विजय लेंडवे (वय १७) असे तिचे नाव आहे. काल (शुक्रवार) रात्री अकरा वाजता ही घटना घडली. घटनेची शहर पोलिसांत नोंद आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, निकिता येथील श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयात बारावीत शिकत होती. पुढील महिन्यात बारावीची परीक्षा आहे. अभ्यासाच्या ताणामुळे गेल्या काही दिवसांपासून ती चिंतेत होती. शुक्रवारी रात्री नऊ वाजता कुटुंबियांनी तिला पाहिले होते. त्यानंतर तिने एका खोलीत जाऊन स्वत:ला कोंडून घेतले. अकरा वाजता तिचे वडील तिच्या खोलीकडे गेले.
मात्र दरवाजा आतून बंद होता. वडिलांनी हाक मारली, पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी ती ओढणीच्या गळफासाने लटकत असल्याचे निदर्शनास आले.
नातेवाईकांनी तिचा गळफास काढून तिला तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ती मृत झाल्याचे घोषित केले. शवविच्छेदन तपासणीनंतर रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
आत्महत्या करण्यापूर्वी तिने कोणतीही चिठ्ठी लिहिलेली नाही. नातेवाईकांकडे चौकशी केली असता, अभ्यासाच्या ताणामुळे तिने आत्महत्या केल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)