रिमझिम पावसात विद्यार्थ्यांचे ‘वर्गासन’

By admin | Published: June 21, 2015 11:21 PM2015-06-21T23:21:20+5:302015-06-22T00:14:03+5:30

रविवारची सकाळ योगमय : विविध स्वयंसेवी संस्थांचाही सहभाग

Students 'Vargasan' in the rainy season | रिमझिम पावसात विद्यार्थ्यांचे ‘वर्गासन’

रिमझिम पावसात विद्यार्थ्यांचे ‘वर्गासन’

Next

सांगली : सकाळी सहा वाजल्यापासूनच पावसाची रिमझिम सुरू असतानाही आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने रविवारी सकाळी सात वाजता सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये योगप्रेमी विद्यार्थी एकत्र आले होते. शासनाने सक्ती केली नसतानाही आणि रविवार हा सुट्टीचा वार असूनही विद्यार्थ्यांची उपस्थिती चांगली होती. यासह विविध स्वयंसेवी संस्थांनीही सकाळी योगासनांच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. साहजीकच आजची सकाळ योगमय झाल्याचेच चित्र होते.
सर्वच ठिकाणी योगासने क्रीडांगणावर आयोजित करण्यात आली होती. शाळा-महाविद्यालयांनी तशी तयारीही केली होती. परंतु सकाळपासून रिमझिम पावसास सुरुवात झाल्याने सर्वांचाच हिरमोड झाला. विद्यार्थी मात्र सकाळी पावणेसात वाजता पालकांसह शाळा परिसरात उपस्थित होते. प्रत्येकांनी योगासने करण्यासाठी चटई आणली होती. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांनी शाळेच्या सभागृहात, रिकाम्या वर्गात, तर काही ठिकाणी व्हरांड्यात जेथे पुरेशी जागा असेल, तेथे जाण्याच्या सूचना दिल्या. साहजीकच बहुतांशी ठिकाणी शालेय वर्गातच विद्यार्थ्यांनी योगासने केली.
जिल्ह्यातील २८०० शाळा, महाविद्यालयांमध्ये योगदिन साजरा करण्यात आला. शहर परिसरातील जिल्हा क्रीडा संकुल, तरुण भारत व्यायाम मंडळ सभागृह, पुरोहित कन्या शाळा, विलिंग्डन महाविद्यालय, सीटी हायस्कूल, चंपाबेन महाविद्यालय, शांतिनिकेतन लोकविद्यापीठ, आमराई क्लब येथे विद्यार्थ्यांची उपस्थिती चांगली होती. याबरोबरच नेहरू युवा केंद्र, पतंजली योगपीठ, आर्ट आॅफ लिव्हिंग, लो. टिळक स्मारक मंदिर आदी स्वयंसेवी संस्थांनी आयोजित योगासन कार्यक्रमात नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. (प्रतिनिधी)

योगदिनाची ३३ मिनिटे!
संघटनमंत्राच्या प्रार्थनेने सकाळी ७ वाजता प्रारंभ. त्यानंतर ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्ध चक्रासन, त्रिकोणासन, भद्रासन, वक्रासन, भुजंगासन, मकरासन, शलभासन, सेतूबंधासन, पवनमुक्तासन, शवासन, कपालभाती, अनुलोमविलोम, भ्रामरी प्राणायाम आदी योगासनांचे प्रात्यक्षिक. एकात्मता शपथेने ७.३३ वाजता कार्यक्रमाची सांगता.
बंदिस्त जागेत योगासने
बहुतांशी ठिकाणी विद्यार्थ्यांनी बंदिस्त जागेत योगासने केली असली, तरी विलिंग्डन महाविद्यालयातील मैदानावर पावसाची तमा न करता एनसीसीच्या स्वयंसेवकांनी योगासने केली. गणपतराव आरवाडे शांतिनिकेतन लोकविद्यापीठातही एनसीसी स्वयंसेवकांच्या योगासनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Web Title: Students 'Vargasan' in the rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.