यंत्राने ऊस तोडल्यास पाल्याचे वजन निश्चितीसाठी अभ्यास समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:24 AM2021-03-06T04:24:59+5:302021-03-06T04:24:59+5:30
यंत्राने ऊस तोडल्यास प्रतिटन पाच टक्के वजावट आकारणी करण्यात येते. त्याबाबत आक्षेप घेतल्याने यंत्राने ऊस तोडणी केल्यास पाचटाचे वजन, ...
यंत्राने ऊस तोडल्यास प्रतिटन पाच टक्के वजावट आकारणी करण्यात येते. त्याबाबत आक्षेप घेतल्याने यंत्राने ऊस तोडणी केल्यास पाचटाचे वजन, वजावटीचे प्रमाण निश्चित करण्यासाठी अभ्यास गटाची नियुक्ती केली आहे. उसातून पाला किती येतो, त्यानुसार वजनात किती घट धरावी याचा अभ्यास करून ही समिती अहवाल देईल.
पाडेगाव संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. सुभाष घोडके या गटाचे अध्यक्ष आहेत. सांगली जिल्ह्यातून राजारामबापू कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, संजीव माने, कोल्हापूर जिल्ह्यातून जवाहर कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी, सातारा जिल्ह्यातून सह्याद्री कारखान्याचे कार्यकारी संचालक अ. बा. पाटील, अहमदनगर जिल्ह्यातून अंबालिका शुगरचे व्यवस्थापक मानसिंग तावरे, गंगामाई इंडस्ट्रीजचे मुख्य शेती अधिकारी रमेश कचरे, सोलापूर जिल्ह्यातून पांडुरंग कारखान्याचे कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी, उस्मानाबाद जिल्ह्यातून प्रगतशील शेतकरी पांडुरंग आवाड, राज्य साखर संघाचे संजय खताळ, पुणे येथून वेस्ट इंडियन शुगरचे अजित चौगुले, एस. एस. गंगावती, साखर आयुक्तालयातील सहसंचालक पांडुरंग शेळके यांचा अभ्यास गटामध्ये समावेश आहे.
चौकट
लुटीला अधिकृत करण्याचा प्रयत्न : धनाजी चुडमुंगे
या अभ्यास गटामध्ये १४ पैकी नऊ प्रतिनिधी साखर कारखान्यांचे, तर दोन प्रतिनिधी कारखान्यांशी संबंधित संस्थेचे आहेत. ही समिती म्हणजे ऊस उत्पादकांच्या लुटीला अधिकृत करण्याचा शासनाचा आणि साखर कारखानदारांचा प्रयत्न आहे. यंत्राने ऊस तोडल्यास प्रतिटन पाच टक्के वजावट आकारणी सुरू आहे. यास ‘आंदोलन अंकुश’ने कायदेशीर मुद्याद्वारे विरोध करून ती वजावट एक टक्के करण्यास भाग पाडले होते, असे ‘आंदोलन अंकुश’चे धनाजी चुडमुंगे यांनी सांगितले.