दुरंदेवाडीतील खाेताच्या पाेरांचा दिव्याच्या उजेडात अभ्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:43 AM2021-05-05T04:43:56+5:302021-05-05T04:43:56+5:30
बिळाशी : बिळाशीजवळील दुरंदेवाडी (ता. शिराळा) येथील महिलेच्या घरी वीज नसल्यामुळे मुलांना गोडे तेलाच्या दिव्यावर अगर रस्त्यावरच्या विजेच्या खांबाखालील ...
बिळाशी : बिळाशीजवळील दुरंदेवाडी (ता. शिराळा) येथील महिलेच्या घरी वीज नसल्यामुळे मुलांना गोडे तेलाच्या दिव्यावर अगर रस्त्यावरच्या विजेच्या खांबाखालील उजेडात अभ्यास करावा लागत आहे. एकीकडे समृद्धीच्या नौबती झडत असताना दुसरीकडे दिव्याच्या उजेडासाठी सर्वसामान्य मोताद असल्याची घटना मनाला चटका लावून जाते.
दुरंदेवाडी बिळाशी (ता. शिराळा) येथील सुनंदा दगडू खोत (दळवी) यांच्या घरी अद्यापही वीज नाही. त्या स्वतः रोजंदारीवर कामाला जातात. गुंठेवारीतील कोरडवाहू जमीन आणि दारिद्र्य अशा अवस्थेत त्यांच्या लेकरांना शिक्षण देणे आणि त्यातून संसाराचा गाडा रेटत राहणे कठीण आहे. गावात योजनेचे गॅस आले पण रॉकेल पूर्ण बंद झाले. त्यानंतर काही दिवस त्यांनी डिझेलवर दिवा लावला. चूल पेटवायलासुद्धा कागदच जाळावा लागतो. दहा बाय दहाचे घर. सगळा संसार खेटूनच. तिथेच गॅस. मग रॉकेलचा दिवा गॅसजवळ लावणे धोकादायकच, म्हणून त्या घरात गोडेतेलाची पणती लावतात. गोडेतेल पण इतके महाग की जेवणापुरता दिवा लावणेच परवडते. एक मुलगी दहावीत, दुसरी नववीत; तर मुलगा सहावीत शिकताेय. या साऱ्यांना अभ्यास एकतर गोडेतेलाच्या दिव्यावर नाहीतर रस्त्यावरच्या दिव्याखाली करावा लागत आहे. वीज घेण्यासाठी एकदा प्रयत्न केलाही; पण पैशाचा प्रश्न आणि कागदपत्रांची जंत्री जमवता न आल्याने वीज आलीच नाही.