सांगलीच्या पारंपरिक गोपाळकाल्यास ‘इव्हेंट’चे स्वरुप
By admin | Published: August 24, 2016 10:52 PM2016-08-24T22:52:35+5:302016-08-24T23:42:34+5:30
आधुनिकतेचा रंग : दहीहंडी राहिली, कृष्ण हरवला; कृष्ण, त्याचे सवंगडी, गाय अशा सर्वच गोष्टींचे स्मरण
सांगली : दीड शतकाहून अधिक काळ चालत आलेला सांगलीतील पारंपरिक गोपाळकाला आता आधुनिकतेचे अनेक रंग लावून ‘इव्हेंट’च्या स्वरूपात समोर आला आहे. कृष्ण, त्याचे सवंगडी, गाय अशा सर्वच गोष्टींचे स्मरण करीत त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करीत साजरा होणारा सांगलीचा पारंपरिक गोपाळकाला हरविल्याची भावना सांगलीकरांमधून व्यक्त होत आहे.
सांगलीत अनेक वर्षांपासून श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाल्याची परंपरा आहे. येथील पांजरपोळ, गोपाळकृष्ण मंदिरात मोठ्या प्रमाणावर हा सण साजरा केला जात होता. श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी, हंडीतील दही अंगावर झेलण्यासाठी, गायींचे दर्शन, प्रसाद अशा गोष्टींसाठी भाविकांची याठिकाणी दिवसभर गर्दी होत होती. ढोलकीवरील धार्मिक गाणी वाजविली जात होती. भजन, कीर्तनाचे कार्यक्रमही होत होते. छोट्या प्रमाणातील दहीहंडीच्या कार्यक्रमात मोठा उत्साह त्यावेळी दिसत होता. गवळी गल्लीतील गवळी समाजबांधवही मोठ्या प्रमाणावर हा सण साजरा करीत होते. अनेक वर्षे ही परंपरा उत्साहाच्या वातावरणात सुरू होती. आजही काही मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीने गोपाळकाला, जन्माष्टमी साजरी केली जाते, मात्र शहराचा मुख्य उत्सव म्हणून नवा गोपाळकाला आता अस्तित्वात आला आहे.
मारुती चौक, सराफ कट्टा येथे पूर्वीपासून मोठ्या दहीहंडीचे कार्यक्रम होत होते. अनेक मंडळांचा सहभाग त्यामध्ये होता. बक्षिसेही दिली जायची. तरीही सुरुवातीला या उत्सवात धार्मिकता, सामाजिकता अधिक होती. पंधरा वर्षात या परंपरेला आधुनिकतेने कवेत घेतले. धार्मिकता, परंपरा मानणाऱ्या लोकांऐवजी राजकीय लोकांची गर्दी या उत्सवात होऊ लागली. कालांतराने हा उत्सव राजकारण्यांनी ‘हायजॅक’ केला. उत्सवाला पूर्वी भजनी मंडळे येत होती, आता त्यांची जागा सेलिब्रेटिंनी घेतली आहे. किरकोळ लोकवर्गणीतून किंवा मंदिरांकडील जमापुंजीतून पूर्वीचा उत्सव होत होता. आता लाखोंची उड्डाणे या दहीहंडीने घेतले आहेत. कोणाची हंडी किती मोठी, कोणाकडे मोठा सेलिब्रेटी, कोणाचे थर सर्वात मोठे अशा निकषांवर दहीहंडीला महत्त्व प्राप्त होऊ लागले. आमदार, खासदार, नगरसेवक, राजकीय मंडळे, संस्था अशा लोकांच्या नावे दहीहंडीचे कार्यक्रम भरविण्यात येऊ लागले. राजकीय गर्दीत दहीहंडीचे अस्तित्व राहिले, मात्र त्यातून कृष्ण हरविला. कृष्णाच्या अस्तित्वापेक्षा स्वत:च्या अस्तित्वासाठी हा सण इव्हेंटच्या स्वरुपात सांगलीत रुजू पाहात आहे. गोपाळकाल्याचा दिवस सोडून सवडीने, सोयीने दहीहंडीचे कार्यक्रम होत आहेत. त्यामुळे श्रावण संपून भाद्रपद आला तरी दहीहंडी साजरी करण्याची नवी परंपरा यातून निर्माण झाली. (प्रतिनिधी)
यांनी जपली परंपरा
सांगलीचे गोपाळकृष्ण मंदिर, जुने मुरलीधर मंदिर, सांगलीवाडीचे विठ्ठल मंदिर, राम मंदिर येथेही पूर्वीपासून मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. सांगलीवाडीत पारायणे व अन्य धार्मिक कार्यक्रमांतून हा सण साजरा होतो. शेकडो वर्षांपासून सांगलीच्या गवळी समाजाने परंपरागत सण जपला आहे.