शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरमध्येच व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:18 AM2021-07-08T04:18:44+5:302021-07-08T04:18:44+5:30
निवेदनात म्हटले आहे की, ग्रामीण भागातील विद्यार्थी, पालक, महाविद्यालयीन कर्मचारी यांना शैक्षणिक सोयीसुविधा ग्रामीण भागातच उपलब्ध होण्यासाठी, शिवाजी विद्यापीठाने ...
निवेदनात म्हटले आहे की, ग्रामीण भागातील विद्यार्थी, पालक, महाविद्यालयीन कर्मचारी यांना शैक्षणिक सोयीसुविधा ग्रामीण भागातच उपलब्ध होण्यासाठी, शिवाजी विद्यापीठाने उपकेंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी २०१३-१४ पासून नियोजित उपकेंद्रासाठी खानापूरची जागा नियोजित झाली आहे.
खानापूरमधील जागेजवळ तलावाचे मुबलक पाणी आहे. शिवाय, जागा राष्ट्रीय महामार्गालगत आहे. यामुळे खानापूर येथील जागेची निवड निश्चित करण्यात आली होती.
अचानक आठवड्यापूर्वी बस्तवडे (ता. तासगाव) येथील जागेस शासनाची तत्त्वत: मान्यता मिळाल्याचे समजले. यामुळे खानापूर घाटमाथ्यावर व तालुक्यात खळबळ उडाली आहे. विद्यार्थी वर्गातून संताप व्यक्त होत आहे. याबाबत बैठका, भेटीगाठी, आंदोलन अशी तयारी सुरू आहे.
वास्तविक खानापूर येथील जागा सर्व दृष्टीने योग्य आहे. खानापूर उपकेंद्रासाठी गट नंबर ५७२/१ मधील ४२.५६ आर अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे त्याचवेळी केली होती. शिवाय, हे ठिकाण खानापूरसह, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, कडेगाव, माण, खटाव या तालुक्यांना मध्यवर्ती आहे. खानापूरसारख्या कायम दुष्काळी व दुर्लक्षित भागाला उपकेंद्र स्थापनेने किमान शैक्षणिक विकासासाठी चांगला लाभ होईल.
निवेदनाबाबत चर्चा करताना जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी उपकेंद्र निर्मितीसाठी खानापूरच्या जागेचा पाठपुरावा वरिष्ठ पातळीवर करू, अशी ग्वाही दिली.