शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगलीतच व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:19 AM2021-06-24T04:19:11+5:302021-06-24T04:19:11+5:30
सांगली : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र तासगावला नव्हे, सांगलीतच व्हायला हवे, अन्यथा या निर्णयाविरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरतील, असा ...
सांगली : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र तासगावला नव्हे, सांगलीतच व्हायला हवे, अन्यथा या निर्णयाविरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरतील, असा इशारा रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे महासचिव अमोल वेटम यांनी दिला आहे.
पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतील जवळपास २८० महाविद्यालयांचा समावेश विद्यापीठांतर्गत होतो. यामध्ये जवळपास तीन लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जिल्ह्यातील आर्ट्स, सोशल सायन्स, सायन्स, कॉमर्स, विधी, इंजिनीअरिंग, आयुर्वेद, वैद्यकीय, आदी अभ्यासक्रमांची बहुतांश महाविद्यालये महापालिका क्षेत्रातच आहेत. विद्यार्थीसुद्धा महापालिका क्षेत्रातच अधिक आहेत. वसतिगृहांसह अन्य सुविधांचा विचार करता शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र हे सांगली शहरात व्हायला हवे.
विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत सांगली शहरातून विद्यार्थी आंदोलनाचे मोठे स्वरूप प्राप्त होण्याची भीती राज्य सरकारला तसेच विद्यापीठाला वाटत आहे. त्यामुळे सांगली शहर सोडून इतरत्र विद्यापीठाचे उपकेंद्र स्थापन करण्याबाबतच्या राजकीय हालचाली सुरू आहेत. याचा आम्ही निषेध करतो. उपकेंद्र सांगली शहरात न झाल्यास आम्ही आंदोलन पुकारू, असा इशारा वेटम यांनी दिला.