इस्लामपूर पालिकेत सुभाष सूर्यवंशींची बाजी
By admin | Published: July 22, 2014 11:13 PM2014-07-22T23:13:24+5:302014-07-22T23:13:51+5:30
नगराध्यक्ष निवडणूक : बाबासाहेब सूर्यवंशींच्या खेळीला खो
अशोक पाटील - इस्लामपूर
एकाच प्रभागातील, पण एकमेकांचे कट्टर विरोधक भाजपचे बाबासाहेब सूर्यवंशी आणि राष्ट्रवादीचे सुभाष सूर्यवंशी यांच्या शह-काटशहच्या राजकारणात सुभाष सूर्यवंशी यांनी बाजी मारली असून, बुधवारी ते इस्लामपूरच्या नगराध्यक्षपदावर विराजमान होत आहेत. त्यांना नगराध्यक्षपद मिळू नये म्हणून शासकीय दरबारी तक्रारी करण्याची बाबासाहेब सूर्यवंशी यांची राजकीय खेळी अयशस्वी ठरली आहे.
बाबासाहेब सूर्यवंशी हे राजारामबापू पाटील यांचे कट्टर समर्थक, मात्र नंतर त्यांनी अण्णासाहेब डांगे यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून ते सुभाष सूर्यवंशी यांचे कट्टर विरोधक बनले. सुभाष सूर्यवंशी पहिल्यापासून ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्याशी एकनिष्ठ राहिले आहेत. पालिकेच्या पाच निवडणुका बुरुड समाजातील या दोन सूर्यवंशींमध्येच रंगल्या. त्यातील तीनवेळा सुभाष सूर्यवंशी यांनी विजय मिळविला.
येणाऱ्या अडीच वर्षासाठी नगराध्यक्षपद इतर मागासवर्गीय पुरुष प्रवर्गासाठी राखीव झाले. या प्रवर्गातून एकमेव सुभाष सूर्यवंशी यांनाच संधी मिळणार हे निश्चित होते, परंतु बाबासाहेब सूर्यवंशी यांनी त्यांना नगराध्यक्षपद मिळू नये म्हणून भूखंड खरेदी घोटाळा पुढे केला. यासाठी त्यांनी तक्रारीही दाखल केल्या आहेत. परंतु त्यांचा निकाल अद्याप प्रलंबित आहे. हा निकाल त्वरित लागण्यासाठी बाबा सूर्यवंशी यांनी युध्दपातळीवर प्रयत्न केले, परंतु त्यात यश आले नाही.
पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांचे सुभाष सूर्यवंशी कट्टर समर्थक आहेत. जयंत पाटील यांनी त्यांना ‘महानंद’च्या संचालकपदीही संधी दिली होती. नेते-पक्षनिष्ठेमुळेच त्यांना नगराध्यक्षपदाची संधी देण्यात आली आहे. सुभाष सूर्यवंशी यांना ही संधी मिळू नये म्हणून सत्ताधाऱ्यांतील काही मंडळींनीही प्रयत्न केले होते, परंतु जयंत पाटील यांनी एकमेव सूर्यवंशी यांचाच अर्ज दाखल करण्याचे आदेश देऊन सर्वांनाच ‘करेक्ट’ कामाचे संकेत दिले.
इस्लामपूर नगरपालिकेच्या इतिहासात बुरुड समाजाला प्रथमच नगराध्यक्षपद मिळणार आहे. निवडीनंतर बुधवारी सकाळी ११ वाजता सुभाष सूर्यवंशी यांची शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढली जाणार आहे.
स्वत:च्या घराचे बांधकाम आणि जागा खरेदीमध्ये केलेला गैरप्रकार याबाबत सुभाष सूर्यवंशी यांच्याविरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारी न्यायप्रविष्ट आहेत. यासाठी अखेरपर्यंत लढा देणार असून, त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यासाठी हा लढा आहे.
- बाबासाहेब सूर्यवंशी, राज्य कार्यकारिणी सदस्य, भाजप.