कृष्णा नदीतून आजपासून उपसाबंदी; कोयना, वारणा धरणात नेमका किती पाणीसाठा..जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 12:24 PM2023-06-23T12:24:15+5:302023-06-23T12:25:05+5:30
पाण्याचा काटकसरीने वापर करा
सांगली : कोयना धरणात सध्या केवळ १० टक्केच पाणीसाठा आहे. मान्सूनची चाहूल नसल्यामुळे गुरुवारपासून कोयना धरणातील विसर्ग शंभर टक्के बंद केला आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने दि. २३ ते २६ जून असे चार दिवस कृष्णा नदीतील शेतीच्या पाणी उपशावर बंदी घातली आहे.
कोयना धरणात सध्या एकूण १०.८२ टीएमसी म्हणजे १० टक्के पाणीसाठा आहे. पाणी वापरासाठी उपयुक्त पाणीसाठा ५.७० टीएमसी असून तो केवळ सहा टक्केच आहे. कोयना धरणातून १०५० क्युसेक विसर्ग सुरू होता, तो गुरुवारपासून बंद केला आहे. वारणा धरणात १०.७० टीएमसी म्हणजे ३१ टक्के पाणीसाठा असून, उपयुक्त पाणीसाठा ३.८२ टीएमसी म्हणजे १४ टक्के साठा आहे.
कोयना धरणात कमी पाणीसाठा असल्यामुळे जलसंपदा विभागाने उपसाबंदी आदेश लागू केला आहे. त्या आदेशानुसार शुक्रवार, दि. २३ ते दि. २६ जूनपर्यंत उपसाबंदी, तर दि. २७ ते दि. ३० जून हा उपसा कालावधी आहे. पिण्याच्या पाणीपुरवठा करणाऱ्या योजना सुरू राहतील. उपसाबंदीमध्ये पिण्याच्या पाणीपुरवठा व्यतिरिक्त इतर कारणासाठी कृष्णा नदीतून पाणी उपसा केल्यास संबंधितांचा पाणी परवाना व विद्युत पुरवठा एक वर्षासाठी रद्द करण्यात येईल.
उपसा संच सामग्री जप्त करून पुढील कारवाई करण्यात येईल. याची गांभीर्याने नोंद घेऊन उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर लाभक्षेत्रातील उभी असणारी पिके जोपासण्यासाठी आधुनिक सूक्ष्म सिंचनाचा वापर करण्याचे आवाहन कार्यकारी अभियंत्या ज्योती देवकर यांनी केले आहे.
काटकसरीने वापर करा
कोयना, वारणा धरणात पाणीसाठा अत्यंत कमी आहे. यामुळे कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या शेतकरी, औद्योगिक वापरकर्त्यांनी, महापालिका, नगरपालिका प्रशासनाने आणि नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन देवकर यांनी केले आहे.