उपनगरे चिखलात, रस्ते पाण्याखाली
By admin | Published: June 17, 2017 12:14 AM2017-06-17T00:14:47+5:302017-06-17T00:14:47+5:30
उपनगरे चिखलात, रस्ते पाण्याखाली
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगली शहरात शुक्रवारी सकाळी चार तास पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शहराची दैना उडाली. मुख्य शहरातील रस्ते, चौक पाण्याखाली गेले आहेत, तर उपनगरे चिखलात रूतली असून नागरिक बेहाल झाले आहेत.
शामरावनगरमधील नागरिकांनी चिखलात ठिय्या आंदोलन करीत महापालिकेचा निषेध केला. नगरसेवकांनाही आंदोलनात सहभागी करून चिखलात बसण्यास भाग पाडले. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनाही चिखलातून पायपीट करीत उपनगराचे विदारक चित्र दाखवून दिले.
शुक्रवारी पहाटेपासून चार तास सांगली शहर व परिसरात पावसाने हजेरी लावली. पहिल्याच पावसात महापालिकेच्या नियोजनाचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. या पावसामुळे शामरावनगरातील नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. या परिसरात महापालिकेने ड्रेनेज योजनेसाठी रस्ते खोदले आहेत. गेल्या चार वर्षापासून या परिसरातील ड्रेनेज काम संपता संपेना. त्याचा त्रास दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांना सहन करावा लागत आहे.
शामरावनगरमधील नागरिकांच्या सहनशीलेतचा बांध फुटला. नागरिकांनी विश्वविनायक चौकात चिखलातच ठिय्या आंदोलन केले. नगरसेवक राजू गवळी, संदीप दळवी, मोहसीन शेख, अत्तार तांबोळी, अनिल नलवडे, दौलतबी मुल्ला, रहिमतबी शेख, विजय नरुटे, नौशाद जांभळीकर, राहुल लोखंडे, सुभाष खांडेकर, शारदा भोसले यांनी भाग घेतला होता. नगरसेवकांसह नागरिक चिखलाने माखले होते. यावेळी प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. नगरसेवकांनी आयुक्त खेबूडकर यांच्याशी संपर्क साधून त्यांना आंदोलनाची माहिती दिली. त्यानंतर आयुक्त खेबडूकर, शहर अभियंता विजय कांडगावे, उपायुक्त स्मृती पाटील यांनी शामरावनगरकडे धाव घेतली. नगरसेवक बाळू गोंधळी, अभिजित भोसले हेही आयुक्तांसोबत होते. यावेळी आयुक्तांसमोर नागरिकांनी तक्रारींचा पाढाच वाचला. या भागात ड्रेनेजचे काम अर्धवट आहे. रस्ते चिखलात गेले आहेत. ड्रेनेज पाईपलाईनसाठी जलवाहिन्या तुटल्या आहेत. त्यामुळे पिण्याचे पाणी नाही. चार वर्षापासून पावसाळ्यात चिखलात रहावे लागत आहे, अशा तक्रारी केल्या. यावर आयुक्तांनी तात्पुरता मुरूम टाकून देण्याची ग्वाही दिली. पावसाळ्यानंतर शामरावनगरमधील रस्ता डांबरीकरण करण्याचे आश्वासन दिले.
विश्वविनायक चौकासह श्रीराम कॉलनी, फिरदोस मोहल्ला, सहारा कॉलनी, मॉडर्न कॉलनी, शिवशक्ती कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, सुंदर कॉलनी, आदित्य कॉलनी या परिसरातील रस्त्यांवर दलदल झाली आहे. या परिसरात नव्याने बांधलेली गटार तुडुंब भरली असून, नागरिकांच्या घराला गटारीचे पाणी लागले आहे. गव्हर्न्मेंट कॉलनीतील विजय कॉलनी, कुंभार मळा, विधाता कॉलनी या गुंठेवारी भागातही चिखलाचे साम्राज्य आहे.
उपनगरांतील नागरिक एकीकडे बेहाल झाले असताना, मुख्य शहरातील परिस्थितीही फारशी समाधानकारक नाही. शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. एकही मुख्य रस्ता वाहतुकीसाठी धड नाही. सर्वच रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यातच चार तासांच्या या पावसाने अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते. शिवाजी मंडई चौकात तर गुडघाभर पाणी होते. झुलेलाल चौक, शहर पोलिस ठाण्याजवळही पाणी साचून होते.
सांगलीच्या बस स्थानकातही पावसाचे पाणी साचल्याने प्रवाशांना पाण्यातून वाट शोधावी लागत होती. कुपवाड लक्ष्मी देऊळ परिसरात तर रस्त्यावरून गटारीचे पाणी वाहत होते. नव्याने केलेल्या गटारीतील पाणी थेट लक्ष्मी देऊळ चौकातून बाहेर पडले होते.
गाडीतून उतरून आयुक्त चिखलात
शामरावनगरमधील नागरिकांनी चिखलात ठिय्या आंदोलन केले. यावेळी आयुक्त रवींद्र खेबूडकर या परिसराच्या पाहणीसाठी आले होते. शामरावनगरमधून विश्वविनायक चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका बाजूला मुरूम टाकण्यात आला आहे. मध्येच ठेकेदाराने मुरूम टाकलेला नाही. त्यामुळे आयुक्तांची गाडी आंदोलकांपर्यंत पोहोचू शकली नाही. अखेर गाडीतून उतरून आयुक्त चिखल तुडवित नागरिकांपर्यंत गेले. तेथे नागरिकांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. आयुक्त चिखलातून आल्याने नागरिकांनी गुलाबपुष्प देऊन त्यांचे आभार मानले.
नगरसेवकांना चिखल फासला
शामरावनगरमधील नागरिकांनी नगरसेवक राजू गवळी व नगरसेविकापुत्र अभिजित भोसले यांनाही चिखलात बसण्यास भाग पाडत त्यांना चिखल फासला. गेल्या तीन वर्षापासून चिखलात रहावे लागत असल्याबद्दल संताप व्यक्त करीत नगरसेवकांना जाब विचारला. या परिसरातील महिला आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी दोघांनाही धारेवर धरले.
रस्त्यावरून चालणे झाले मुश्किल
शामरावनगर परिसरात दलदलीमुळे नागरिकांना चालणेही मुश्किलीचे झाले आहे. दोन दिवसांपूर्वी शाळा सुरू झाल्या आहेत. पण चिखलामुळे मुलांना शाळेतही जात आलेले नाही. रुग्ण, गरोदर महिलांना रुग्णालयात जात येत नाही, अशी परिस्थिती या भागात झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या कारभाराबद्दल नागरिकांच्या संतापाचा बांध फुटत चालला आहे.