चांदोली अभयारण्य विकासासाठी केलेल्या प्रयत्नांना यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:33 AM2021-02-27T04:33:47+5:302021-02-27T04:33:47+5:30
फोटो ओळ - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या चांदोली अभयारण्यामध्ये नव्याने होणाऱ्या रिंग रोडची माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी पाहणी ...
फोटो ओळ - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या चांदोली अभयारण्यामध्ये नव्याने होणाऱ्या रिंग रोडची माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी पाहणी केली. यावेळी समाधान चव्हाण, महादेव मोहिते, गोविंद लंगोटे आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : चांदोली अभयारण्यातील जैवविविधतेचा आनंद घेण्याकरिता आम्ही लोकप्रतिनिधी असताना सुचवलेला जनीच्या आंब्यापासूनचा नवीन रिंग रोड पर्यटकांसाठी लवकरच खुला होणार आहे, अशी माहिती माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी दिली.
ते म्हणाले, चांदोली परिसर आणि येथील अभयारण्य पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी वैयक्तिक पातळीवर शासन दरबारी प्रयत्न करत होतो. तत्कालीन मंत्रिमहोदय व मंत्रालयातील विविध विभागांचे अधिकारी यांच्यासोबत अनेक बैठका घेतल्या होत्या. यातीलच एक भाग म्हणजे पर्यटकांना झोळंबी चौकीपासून जनीच्या आंब्याला वळसा घालून पायर माळ, घोडे माळ येथून जलाशयाशेजारील रिंग रस्ता व्हावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्या प्रयत्नाला यश आले असून, या रस्त्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच हा रस्ता पर्यटकांसाठी खुला होणार आहे.
यामुळे पर्यटकांना आता जनीच्या आंब्यापासून एका बाजूला विस्तीर्ण असा वसंत सागर जलाशय तर दुसऱ्या बाजूला घनदाट अभयारण्य, त्यातील छोटे-मोठे धबधबे, विविध प्रकारच्या वनस्पती, प्राणी, पक्षी हे आता आणखीन जवळून पाहता येणार आहे. हा एक नवीन जंगल सफारीचा अनुभव पर्यटकांना घेता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.