गणेशच्या संघर्षाला यशाचे कोंदण...जत दुष्काळी भागातील प्रेरणादायी कहाणी; कुलाळवाडीच्या टेंगलेचे युपीएससीमध्ये यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:30 AM2018-04-29T00:30:18+5:302018-04-29T00:30:18+5:30
सांगली : जतसारखा दुष्काळी भाग...टंचाई आणि संघर्ष पाचवीला पूजलेला...जिथे पिण्याच्या पाण्याची भ्रांत तिथे नवी स्वप्न पाहण्यासाठी आणि ती पूर्ण करण्यासाठी आकाश तरी कुठे मिळणार?
सांगली : जतसारखा दुष्काळी भाग...टंचाई आणि संघर्ष पाचवीला पूजलेला...जिथे पिण्याच्या पाण्याची भ्रांत तिथे नवी स्वप्न पाहण्यासाठी आणि ती पूर्ण करण्यासाठी आकाश तरी कुठे मिळणार? याच अडचणींना भेदत कुलाळवाडी (दरीबडची) ता. जत येथील गणेश महादेव टेंगले या तरुणाने युपीएससी परीक्षेत यश मिळवून आपल्या संघर्षाला यशात रूपांतरीत केले आहे. युपीएससी परीक्षा निकालात गणेशने ६१४ वी रॅँक मिळवित ग्रामीण भागातील तरुणांपुढे आदर्श निर्माण केला आहे.
शुक्रवारी रात्री युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि जिल्ह्यातून किती तरुणांनी यश मिळविले, याची माहिती घेताना सांगलीच्या स्वागत पाटीलबरोबरच दरीबडचीच्या गणेश टेंगलेनेही यश मिळविल्याचे समजले. अभ्यासाच्या निमित्ताने दिल्लीतच असलेल्या गणेशशी संवाद साधला असता, त्याच्या प्रत्येक वाक्यातून आत्मविश्वासाबरोबरच हे यश मिळविण्यासाठी त्याला कराव्या लागलेल्या संघर्षाची प्रचिती येत होती.
कुलाळवाडीत प्राथमिक, तर १० वीपर्यंतचे शिक्षण भैरवनाथ हायस्कूल, दरीबडची येथे झालेल्या गणेशने ११ वी, १२ वी पर्यंतचे शिक्षण सांगली हायस्कूलमधून पूर्ण केले. त्यानंतर केआयटी, कोल्हापूरमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली; पण मळलेल्या वाटेवरून न चालता त्याने युपीएससीचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला. आयुष्यातील सर्वात मोठी ‘रिस्क’ पत्करून दिल्लीत पाऊल टाकल्याचे गणेश सांगतो.
आई-वडील पूर्णपणे अशिक्षित, तर भाऊ औरंगाबाद जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक अशी कुटुंबाची पार्श्वभूमी. वडील काही वर्षांपूर्वीपर्यंत ऊसतोड मजूर म्हणून काम करत होते. दुष्काळाशी दोन हात करत संघर्षमय जीवन जगणाऱ्या कुटुंबात वाढलेल्या गणेशला नैसर्गिक परिस्थिती डोंगराएवढी वाटायची आणि त्यातूनच स्पर्धा परीक्षेशिवाय पर्याय नाही हे त्याच्या मनाने ठरविले.गणेश सांगतो की, अभ्यासासाठी दिल्लीला जाण्याचा माझा निर्णय कुटुंबाला नवा असला तरी, त्यांनी त्यास पाठिंबा दिला. घरातून मिळालेले संस्कार, प्रामाणिकपणा आणि जिद्द, चिकाटी याच्या जोरावरच हे लक्ष्य मी भेदू शकलो..
स्मार्ट स्टडी करा, पण छंदांना मुरड घालू नका!
अभ्यास करणाºया मुलांसाठी गणेशचे सांगणे आहे की, केवळ अभ्यास न करता परीक्षा समजून घ्या. स्मार्ट स्टडी करायचा आणि तो करताना आपल्या छंदांना अजिबात मुरड घालायची नाही. मला सोशल मीडिया विशेषत: ट्विटर आवडतो. तर मी परीक्षेच्या काळातही नियमित सोशल मीडियाच्या ‘टच’मध्ये होतो. यु-ट्युबवर प्रेरणादायी व्हिडिओ असतात. ते पाहूनही आपली मानसिकता बदलता येते. सध्या निराशावादी जीवन असल्याचा ‘भास’ होतो, मात्र त्यातूनच प्रत्येकाने प्रेरणा घ्यावी.