ओढ्याच्या पुरात वाहूून गेलेल्या तीन महिलांना वाचविण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:20 AM2021-06-05T04:20:24+5:302021-06-05T04:20:24+5:30
संख : शेतातील काम आटोपून परतणाऱ्या पाच्छापूर (ता. जत) येथील तीन मजूर महिलांना गुरुवारी सायंकाळी ओढ्याच्या पुरातून वाचवण्यात ग्रामस्थांना ...
संख : शेतातील काम आटोपून परतणाऱ्या पाच्छापूर (ता. जत) येथील तीन मजूर महिलांना गुरुवारी सायंकाळी ओढ्याच्या पुरातून वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले.
पूर्व भागातील पाच्छापूर येथील कल्पना आप्पासाहेब सरगर (वय ४६), मंगल राजकुमार बाबर (४५), गुलशन साहेबलाल शेख (४५), जयश्री निंगाप्पा पाटील व मीनाक्षी विलास निकम या शेतमजूर महिला शेतात कामाला गेल्या होत्या. सायंकाळी सहाच्या दरम्यान काम आटोपून त्या घरी परत निघाल्या होत्या. मेंढेगिरी, देवनाळ, उंटवाडी, रावळगुंडवाडी, अमृतवाडी, पाच्छापूर या ठिकाणी गुरुवारी दुपारी दोन तास मुसळधार पाऊस पडला. अमृतवाडीतून येणाऱ्या जत ओढ्याला त्यामुळे भरपूर पाणी आले होते. ओढ्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असूनही महिलांनी घराच्या ओढीने यातून वाट काढत जाण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने जयश्री पाटील, मीनाक्षी निकम या महिला ओढ्याच्या काठावर थांबल्या, तर कल्पना सरगर, मंगल बाबर, गुलशन शेख या तिघींनी पुढे जाण्याचा निर्णय घेतला.
एकमेकींना आधार देत काही अंतर पाण्यातून त्यांनी पार केल्यावर त्या ओढ्याच्या मध्यभागी पोहोचल्या. नंतर पाण्याचा प्रवाह अधिकच असल्याने पायाखालची वाळू घसरून गेली. त्यांचा एकमेकींना धरलेला हात सुटला. त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाऊ लागल्या. त्यामुळे महिलांचा एकच आरडाओरडा सुरू झाला.
आवाज ऐकून ओढ्याशेजारील कृषी सहायक श्रीकांत नाटीकर, मोहसीन मुजावर, आनंदा जाधव, युनूस मुल्ला, आसिफ सुतार, सरदार सनदी, वृषभ पोद्दार, मनोज देवकर या तरुणांनी कल्पना सरगर, मंगल बाबर या महिलांना वाचविले. तिसरी महिला गुलशन शेख एक किलोमीटर अंतरावर पाण्यातील छोट्या झाडाच्या फांदीला धरून थांबलेली होती. तिला दोर टाकून अनिल भोसले, आर्यन सुतार, अमोल बाबर, साहेबलाल शेख, सचिन सरगर, तानाजी कोळी यांनी वाचविले.
ग्रामस्थांनी वाहून जाणाऱ्या तिन्ही महिलांना दोन तासाच्या अथक् प्रयत्नानंतर सुखरूपपणे पाण्यातून बाहेर काढले.