उमेदवारांच्या ताकदीची ‘अर्थ’पूर्ण चाचपणी सुरू

By admin | Published: October 25, 2016 12:59 AM2016-10-25T00:59:30+5:302016-10-25T01:04:11+5:30

विधानपरिषद निवडणूक : राष्ट्रवादीकडून शेखर गोरेंचेही नाव चर्चेत

Successful checking of candidates' strengths | उमेदवारांच्या ताकदीची ‘अर्थ’पूर्ण चाचपणी सुरू

उमेदवारांच्या ताकदीची ‘अर्थ’पूर्ण चाचपणी सुरू

Next

सांगली : सांगली-सातारा विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेसमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पक्षीय संख्याबळापेक्षा उमेदवारांच्या वैयक्तिक ताकदीची ‘अर्थ’पूर्ण चाचपणी केली जात आहे. काँग्रेसने मोहनराव कदमांच्या उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न चालविले असतानाच, राष्ट्रवादीतून दिलीपतात्या पाटील यांच्यापाठोपाठ आता माण तालुक्यातील शेखर गोरे यांचेही नाव चर्चेत आले आहे. या दोन्ही उमेदवारांच्या बळाची चाचपणी सुरू आहे.
सांगली-सातारा विधानपरिषद निवडणुकीत यंदा आघाडी मोडण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याची मानसिकता केली आहे. काँग्रेसने याबाबतचे स्पष्ट संकेत दिले असून राष्ट्रवादीनेही काँग्रेसच्या उमेदवारासमोर तुल्यबळ उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी लक्ष घातले आहे. सांगली जिल्ह्यातून माजी मंत्री आ. जयंत पाटील यांचे निष्ठावंत दिलीपतात्या पाटील यांचे नाव पुढे आले आहे. दिलीपतात्यांनीही त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे शेखर गोरेंसारखा सर्व बाजूंनी तगडा उमेदवारही चर्चेत आणला आहे. या दोन्ही उमेदवारांच्या ताकदीची चाचपणी केली जात आहे. दोन्ही इच्छुक तुल्यबळ असल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा निर्णय शेवटच्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे.
मोहनराव कदम यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांनी पुढाकार घेतला आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. पतंगराव कदम, वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांचा समावेश आहे. काँग्रेसच्या दोन्ही जिल्ह्यांच्या कमिटीमार्फत मोहनराव कदम यांच्या नावाची शिफारस केली आहे. मोहनराव कदम यांना त्यांचे बंधू पतंगराव कदम यांची ताकद लाभणार असल्याने, तितक्या तोडीचा उमेदवार देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी करीत आहे. सद्य:स्थितीत मतदारांच्या संख्याबळाचे गणित राष्ट्रवादीच्या बाजूने झुकलेले आहे. तरीही या मतदार संघातील गेल्या काही निवडणुकांचा आढावा घेतला असता, संख्याबळापेक्षा उमेदवारांच्या व्यक्तिगत ‘अर्थ’पूर्ण ताकदीचाच जास्त प्रभाव पडल्याचे दिसून आले आहे.
त्यामुळे सर्व गोष्टींची आकडेमोड दोन्ही पक्षांतील नेते करीत आहेत. दोन्ही काँग्रेसच्या नेतेमंडळींनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविली आहे. (प्रतिनिधी)
भाजप, सेना शांत : भूमिकेकडे लक्ष
राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या तुलनेत कमी संख्याबळ असलेल्या भाजप व शिवसेनेने सांगली-सातारा विधानपरिषद निवडणुकीबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. दोन्ही काँग्रेस स्वबळावर लढण्याची तयारी करीत असल्याने या दोन्ही पक्षांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांना कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. अन्य पक्षांच्या सदस्यांना खेचण्यासाठी दोन्ही काँग्रेसमधील नेत्यांनी आतापासूनच प्रयत्न चालविले आहेत. मतदारसंघात निवडून येण्याइतपत संख्याबळ नसल्याने भाजप, सेना शांत असले तरी, त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक न लढविण्याचा निर्णय या पक्षांनी घेतल्यानंतर त्यांच्या सदस्यांना खेचण्याचे जोरदार प्रयत्न होणार आहेत.
 

 

Web Title: Successful checking of candidates' strengths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.