'अंश' बनण्यासाठी कडेगावच्या 'अश्विनी'ची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 11:12 AM2022-04-04T11:12:38+5:302022-04-04T11:13:09+5:30

लिंग परिवर्तनाच्या या धाडसी निर्णयाला त्यांच्या कुटुंबियांनी पाठींबा दिला आणि परिवर्तनाची नवी दिशा समाजाला दिली आहे.

Successful first phase surgery for gender reassignment of Ashwini Khalipe at Tondoli in Kadegaon taluka | 'अंश' बनण्यासाठी कडेगावच्या 'अश्विनी'ची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी

'अंश' बनण्यासाठी कडेगावच्या 'अश्विनी'ची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी

googlenewsNext

प्रताप महाडीक

कडेगाव : कडेगाव तालुक्यातील तोंडोली येथील अश्विनी खलिपे दिल्ली येथील सर गंगाराम रुग्णालयात लिंग बदल करण्यासाठी उपचार घेत आहेत. त्यांच्यावर पहिल्या टप्प्याची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आता 'अश्विनी'चे नाव  बदलून 'अंश' असे करण्यात आले आहे.

अश्विनी खलिपे या २८ वर्षीय तरुणीने लिंग परिवर्तन करण्याचा मानस बाळगला अणि काही महिन्यांपूर्वी  गॅझेट करून अंश खलिपे हे नाव धारण केले आहे. पहिल्या टप्प्यातील शस्त्रक्रिया १६ मार्च रोजी झाली. आता चार  महिन्यांनी दुसऱ्या टप्प्यातील शस्त्रक्रिया होणार आहे. त्यानंतर तिसरी शस्त्रक्रिया होणार आहे. या तिन्ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर लिंग बदल करण्याचे सर्व उपचार यशस्वीपणे पूर्ण होतील. मागील वर्षभरापासून त्यांना लिंग परिवर्तनाची प्रतीक्षा होती.

कोरोना संकटामुळे या शस्त्रक्रियेला थोडासा उशीर  झाला. आता मात्र पहिल्या टप्प्यातील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर दिलासा मिळाला आहे. याशिवाय अंश खलिपे या नावाने समाजात ओळख होत आहे याचाही त्यांना आनंद आहे. लहानपणापासूनच पुरुषाप्रमाणे कृती अश्विनीच्या शारिरीक जडणघडणीतुन दिसुन येत होत्या. करारीपणा, निडरपणा, पोशाख या सर्व बाबतीत पुरुषाप्रमाणे वर्तन होते. लिंग परिवर्तनाच्या या धाडसी निर्णयाला त्यांच्या कुटुंबियांनी पाठींबा दिला आणि परिवर्तनाची नवी दिशा समाजाला दिली आहे.

पत्रकारिता आणि सामाजिक कार्यातही नावलौकिक

अंश खलिपे यांनी सांगली येथील एन.एस.एस.लॉ कॉलेज मध्ये वकिलीचे शिक्षण पूर्ण केले आहे व टिळक विद्यापीठाच्या सांगली शाखेत सध्या पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. पत्रकारिता आणि सामाजिक कार्यातही त्यांनी नावलौकिक मिळविला आहे.

बीड जिल्ह्यातील ललित साळवेंचे घेतले मार्गदर्शन

यापूर्वी बीड जिल्ह्यातील पोलीस शिपाई ललिता साळवे यांच्यावर लिंग बदल शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. त्यांना आता ललित साळवे या नावाने ओळखले जाते. त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन अंश खलीपे यांनी मार्गदर्शन घेतले. समाजातील दबलेल्या असंख्य तरुण-तरुणींसाठी खलिपे यांचा लिंग परिवर्तनाचा यशस्वी प्रयोग दिशादर्शक ठरणार आहे. पहिली शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर अंश खलिपे आता कडेगाव येथील घरी विश्रांती घेत आहे. लवकरच अंश खलिपे हा एक  पत्रकार, वकील आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून नव्या ऊर्जेने कार्यरत होणार आहे.



कुटुंबीय व समाजातून प्रोत्साहन
 
मला आई, वडील, भाऊ,वहिनी  तसेच कुटुंबिय आणि समाजातील चांगल्या लोकांकडुन उर्जा व शक्ती मिळाली. तसेच माझ्या कार्यक्षेत्रात काम करणारे  सहकारी  व मित्रमैत्रीणींकडुन  मोलाची साथ व प्रोत्साहन मिळाले. यामुळे हा निर्णय घेणे मला सोपे झाल्याचे अंश खलिपे (पूर्वीचे नाव : अश्विनी खलीपे)ने सांगितले.

Web Title: Successful first phase surgery for gender reassignment of Ashwini Khalipe at Tondoli in Kadegaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली