Sangli: बिऊरच्या जवानाचा राजस्थानमध्ये आकस्मिक मृत्यू, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By संतोष भिसे | Published: January 16, 2024 05:24 PM2024-01-16T17:24:11+5:302024-01-16T17:30:36+5:30
भावाचे लग्न ठरविण्यासाठी येणार होते गावी, त्याआधीच काळाचा घाला
शिराळा : बिऊर (विश्रामबाग) ता. शिराळा येथील सैन्य दलात कार्यरत असणारे तेजस युवराज मोरे (वय २४) हे आपले कर्तव्य बजावत असताना चक्कर येऊन पडले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र रविवारी (दि. १४) त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या पार्थिवावर आज, मंगळवारी सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मृतदेहास वडील युवराज मोरे, भाऊ तुषार यांनी भडाग्नी दिला. भावाचे लग्न ठरविण्यासाठी तेजस हे सोमवारी गावाकडे येणार होते, मात्र त्यांच्याऐवजी त्यांचा मृतदेहच दारात आल्याने कुटुंबियांनी एकच आक्रोश केला.
तेजस व तुषार हे दोघे भाऊ २०१८ मध्ये एकत्रच सैन्यदलात भरती झाले होते. तेजस मॅकनाईज विभागात राजस्थानमधील लालगड येथे टेन्मेंट इन्फंटरी युनिट मध्ये शिपाई पदावर कार्यरत होते. कर्तव्य बजावत असताना रविवारी चक्कर येऊन पडले. त्यांना तातडीने तेथील सैनिकी रुग्णालयात नेले. तेथून गंगानगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती अधिकच ढासळल्याने हेलिकॉप्टरने चंदीगड येथील सैनिकी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला.
तेजस यांचा मृतदेह घरी आल्यावर आई अनिता, वडील युवराज, भाऊ तुषार यांनी ह्रदय हेलावणारा आक्रोश केला. यावेळी नायब तहसिलदार हसन मुलाणी, पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांनी पुष्पचक्र वाहिले. यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, मंडल अधिकारी सविता पाटील, गावकामगार तलाठी राहुल काळे, पोलिस पाटील सीताराम पाटील आदी उपस्थित होते.
व्हिसेरा राखून ठेवण्यात आला
तेजस यांचे भाऊ तुषार हिमाचल प्रदेशात लष्करात कार्यरत आहेत. ते नुकतेच सुट्टीवर बिऊर येथे आले आहेत. तेजस यांना सुट्टी मिळाली नव्हती, मात्र त्यांनी कुटुंबियांना मी कोणत्याही परिस्थितीत सोमवारी (दि. १५) येत असल्याचे सांगितले होते. भावाच्या विवाहासाठी स्थळ पाहून लग्न करण्यासाठी ते येणार होते. मात्र तसे होऊ शकले नाही. त्यांचा मृत्य नेमका कशामुळे झाला याचे कारण स्पष्ट झालेले नाही. व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.