सांगलीत चित्रपट निर्मितीसाठी पोषक वातावरण- सुधीर गाडगीळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 09:53 PM2019-02-22T21:53:20+5:302019-02-22T23:51:35+5:30
वैविध्यपूर्ण निसर्गसंपदा, उपलब्ध साधनांचा विचार करता, सांगली परिसरात अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांचे चित्रीकरण होत आहे.
सांगली : वैविध्यपूर्ण निसर्गसंपदा, उपलब्ध साधनांचा विचार करता, सांगली परिसरात अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांचे चित्रीकरण होत आहे. ‘कट्यार काळजात घुसली’, ‘काशिनाथ घाणेकर’ यासारखे चित्रपट सांगलीत चित्रीत झाले आहेत. त्यामुळे चित्रपट निर्मितीसाठी या भागात पोषक वातावरण आहे, असे प्रतिपादन आमदार सुधीर गाडगीळ यांनी शुक्रवारी सांगलीत केले.
सांगली फिल्म सोसायटीच्यावतीने इतर संस्थांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या पहिल्या सांगली एशियन चित्रपट महोत्सवाचे आ. गाडगीळ यांच्याहस्ते प्रारंभ झाला. यावेळी सांगलीचे सुपुत्र आणि चित्रपट निर्माते सुनील फडतरे यांना आ. गाडगीळ यांच्याहस्ते पुरस्काराने गौरविण्यात आले.
गाडगीळ म्हणाले, हिंदीपेक्षाही मराठीत अनेक दर्जेदार चित्रपट तयार होत आहेत. मला स्वत:ला चित्रपट खूप आवडतात. श्वाससारखा चित्रपट पाहिल्यानंतर मराठी चित्रपटांचा दर्जा लक्षात येतो. ज्यावेळी वेळ असेल तेव्हा मराठी चित्रपट पाहणे आवडते. सध्या सांगली परिसरात अनेक चित्रपटांचे चित्रीकरण होत आहे, ही समाधानाची बाब आहे. या भागात चित्रपटांची निर्मिती होत असल्याने स्थानिक कलाकारांना संधी मिळत असून इतर रोजगाराच्या संधीही वाढत आहेत. यापुढेही सांगलीत अधिक प्रमाणात चित्रपटांचे चित्रीकरण व्हावे यासाठी प्रयत्नशील असणार आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात आशियातील विविध भाषांतील चित्रपट दाखविले जाणार आहेत. पहिल्या दिवशी पुष्पक विमान यासह इतर चित्रपटांना रसिकांची गर्दी होती. सायंकाळी चित्रपट निर्माते सुनील फडतरे यांनी रसिकांशी संवाद साधला. फिल्म सोसायटीचे अध्यक्ष अशोक सावंत यांनी स्वागत केले, तर कार्यक्रम सचिव डॉ. निरंजन कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. मानपत्राचे वाचन महेश कराडकर यांनी केले. यावेळी सचिव यशवंतराव घोरपडे, अरुण दांडेकर यांच्यासह सांगलीकर कलारसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुनील फडतरे म्हणाले, मराठी चित्रपट तयार करणे माझे काम असले तरी, त्यांचा दर्जाही राखला जात आहे. ‘कट्यार’सारखा चित्रपट परदेशात गेला. ६२ लाख रुपये कर भरणारा तो पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. आतापर्यंत १६ चित्रपट केले आहेत अजूनही काही चित्रपटांची निर्मिती करणार आहे. ‘काशिनाथ’मध्ये सांगलीच्या स्थानिक कलाकारांना संधी दिली. आता सांगली परिसरातच ‘सर्कस’ या आगामी चित्रपटाचे चित्रीकरणही लवकरच सुरू करण्यात येणार आहे.