ग्रामस्वच्छता अभियानास स्थगिती हे महाराष्ट्राचे दुर्दैव
By admin | Published: February 11, 2016 12:17 AM2016-02-11T00:17:24+5:302016-02-11T00:32:34+5:30
स्मिता पाटील : प्रसंगी राज्यभर आंदोलन करू
सांगली : संत गाडगेबाबा यांच्या नावाने आर. आर. पाटील आबांनी सुरू केलेल्या ग्रामस्वच्छता अभियानाला स्थगिती देण्याचा राज्य शासनाचा निर्णय म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, अशी टीका आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी बुधवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केली.
त्या म्हणाल्या की, स्वत: हातात झाडू घेऊन ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला स्वच्छतेचा संदेश दिला, त्या संत गाडगेबाबा महाराजांच्या नावे सुरू झालेली ग्रामस्वच्छता योजना युनोपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या योजनेचा सन्मान झाला, ती योजना केवळ राजकीय हेतूने बंद करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. स्थगितीच्या निर्णयामागे निश्चितच राजकारण आहे. नंतर ही योजनाच रद्द करण्याचा हेतूही दिसून येतो.
शासनाने ही योजना बदलून दुसऱ्या नावाने आणण्याच्या हालचाली सुरू केल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे संत गाडगेबाबांच्याच नावाला या सरकारचा विरोध आहे का?
महाराष्ट्राची ओळख पुरोगामी राज्य म्हणून केली जाते. त्यामुळे अशा पुरोगामी राज्यात अशापद्धतीचे नावांच्या बदलाचे राजकारण करणे, तसेच चांगल्या योजना राजकीय हेतूने बंद करणे अयोग्य आहे. पंतप्रधानांनी राष्ट्राला स्वच्छ भारत अभियानातून स्वच्छतेचा संदेश दिला असताना, त्यांच्याच पक्षाचे राज्यातील सरकार स्वच्छता अभियानाला स्थगिती देत आहे, हा प्रचंड मोठा विरोधाभास आहे. आम्ही या गोष्टीला विरोध करू. प्रसंगी राज्यभर याप्रश्नी आंदोलन करावे लागले तरी, आम्ही त्यासाठी तयार आहोत.
राष्ट्रवादीने आबांच्या अनेक चांगल्या धोरणांना, निर्णयांना पाठबळ दिले होते. त्यामुळे याप्रश्नीही पक्षाचे मला निश्चितपणे पाठबळ असेल. पक्षश्रेष्ठींशीही याबाबत चर्चा केली आहे, असे त्या म्हणाल्या.
यावेळी ताजुद्दीन तांबोळी, योगेंद्र थोरात उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शिवरायांच्या नावेही राजकारण
तासगावातील नगरपालिकेच्या व्यापारी संकुलास आबांच्या प्रयत्नातून निधी मिळाला होता. त्यामुळे आम्ही आबांचे नाव संकुलाला देण्याचा निर्णय घेतला होता. छत्रपती शिवरायांबद्दल सर्वांनाच आदर आहे, पण त्यांच्या नावाचा वापर राजकारणासाठी करणे चुकीचे आहे, असे मत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.