..'तर साखर कारखान्यांच्या अध्यक्षांच्या घरासमोर ठिय्या मारु'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 05:37 PM2022-03-29T17:37:07+5:302022-03-29T17:37:38+5:30
जिल्ह्यात सुमारे सव्वालाख हेक्टर ऊसाचे क्षेत्र आहे. त्यातील एक लाख हेक्टर ऊसाचे गाळप झाले आहे. उर्वरीत ऊस शिल्लक आहे. यादरम्यान, काही कारखाने गाळप हंगामाची सांगता करण्याच्या तयारीत आहेत.
सांगली : जिल्ह्यात अद्याप सुमारे २० ते २५ हजार हेक्टरवरील तोडणी आणि गाळप होईपर्यंत साखर कारखाने बंद करू नयेत अशी मागणी स्वाभिमानी संघटनेने केली आहे. कारखाने बंद करण्याचा प्रयत्न झाल्यास आंदोलनाचा इशारा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.
खराडे म्हणाले, जिल्ह्यात सुमारे सव्वालाख हेक्टर ऊसाचे क्षेत्र आहे. त्यातील एक लाख हेक्टर ऊसाचे गाळप झाले आहे. उर्वरीत ऊस शिल्लक आहे. यादरम्यान, काही कारखाने गाळप हंगामाची सांगता करण्याच्या तयारीत आहेत, मात्र त्याचेही गाळप झालेच पाहिजे.
ताकारी, म्हैसाळ, टेंभू, आरफळ, विसापूर, पुणदी सिंचन योजना सुरू झाल्याने दुष्काळी भागात ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. ऊस वाढला तरी तासगाव, नागेवाडी, महांकाली आणि माणगंगा केन ॲग्रो कारखाने बंद आहेत. त्यामुळे ऊसाच्या संपुर्ण गाळपात अडचणी आहेत.
ऊस शिल्लक राहण्याची शक्यता असल्याची बाब साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या निदर्शनास यापूर्वीच आणून दिली होती. त्यानुसार त्यांनी सर्व कारखान्यांना आवश्यक सूचनाही दिल्या होत्या. तरीही काही कारखान्यांनी गाळप हंगामाच्या सांगतेची तयारी सुरू केली आहे. सांगलीतील दत्त इंडिया तथा वसंतदादा साखर कारखान्याने ३१ मार्चला कारखाना बंदचे जाहीर निवेदन दिले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पुढाकार घ्यावा. सर्व कारखानदारांची बैठक घेऊन १०० टक्के ऊसाच्या गाळफाचे आदेश द्यावेत. तोपर्यंत कारखाने बंद करू नयेत असेही आदेश द्यावेत.
... तर कारखान्याच्या अध्यक्षांच्या घरासमोर आंदोलन
गाळपापूर्वीच कारखाने बंद करणाऱ्या कारखान्यांच्या अध्यक्षाच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा खराडे यांनी दिला. तशी वेळ येऊ नये यासाठी कारखान्यांनी कार्यक्षेत्रातील ऊसाच्या कांड्याचे गाळप होईल याची दक्षता घ्यावी असे ते म्हणाले.