साखर कारखान्यांनी आता सीएनजी निर्मिती करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:27 AM2021-01-23T04:27:22+5:302021-01-23T04:27:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : साखर कारखान्यांनी आता मळीपासून इथेनॉल, अल्कोहोल बनवून शिल्लक राहिलेल्या प्रेसमडपासून सीएनजी निर्मितीचा प्रकल्प उभा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा
: साखर कारखान्यांनी आता मळीपासून इथेनॉल, अल्कोहोल बनवून शिल्लक राहिलेल्या प्रेसमडपासून सीएनजी निर्मितीचा प्रकल्प उभा करावा, असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिला. दिवंगत फत्तेसिंगराव नाईक आप्पांचा पुतळा भावी पिढीला चेतना व प्रेरणा देणारा ठरेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर लोकनेते फत्तेसिंगराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार धैर्यशील माने, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आमदार मोहनराव कदम, आमदार सुमनताई पाटील, आमदार अरुण लाड, माजी आमदार शिवाजीराव नाईक, सत्यजित पाटील, सत्यजित देशमुख, ‘विश्वास’चे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, विराज नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
खासदार पवार म्हणाले की, सेवेचे व्रत घेऊन सर्वसामान्यांसाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या आप्पांचे अखंड स्मरण राहावे, यासाठी हा पुतळा दिशादर्शक ठरेल. लाचार बनायचे नाही, तत्त्वाशी तडजोड करायची नाही, हे त्यांचे विचार होते. एकनिष्ठपणा, नम्रपणा याचे मूर्तीमंत उदाहरण असलेल्या आप्पांनी कधीही मोठेपणा गाजवला नाही. त्यांनी शेती, पाणी, शिक्षणाच्या विकासासह सहकार चळवळ समृद्ध केली. नाईक कुटुंबीय नेहमी आमच्या पाठीशी राहिले. आता हाच वारसा आमदार मानसिंगराव नाईक चालवत आहेत.
ते म्हणाले की, साखर कारखान्यांनी मळीपासून इथेनॉल, अल्कोहोल निर्मिती करून शिल्लक राहिलेल्या प्रेसमडपासून सीएनजीची निर्मिती करण्याचा प्रकल्प उभा करावा. यातून ऊस उत्पादकांना जादा दर देता येईल.
जयंत पाटील म्हणाले की, वाकुर्डे योजनेसाठी शंभर कोटींचा निधी दिला आहे. ही योजना दोन वर्षांत पूर्ण करून आप्पांचे स्वप्न पूर्ण करू. चांदोली पर्यटन विकासाच्या आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले की, आप्पांनी पाणीप्रश्नाने राजकारणाची सुरुवात केली. सामुदायिक शेती रुजवली. शिराळा, शाहूवाडी तालुक्यात पाणी योजना राबवून हरितक्रांती केली.
सौ. सुनीतादेवी नाईक, अमरसिंह नाईक, राजेंद्र नाईक, नगराध्यक्षा सुनीता निकम, ॲड. भगतसिंग नाईक, सम्राटसिंह नाईक, दिनकर पाटील, डॉ. प्रताप पाटील, दत्तात्रय पाटील, सुरेश चव्हाण, विजयराव देशमुख, राम पाटील, युवराज गायकवाड, रणजितसिंह नाईक, दिनकर महिंद, प्रमोद नाईक, बी. के. नायकवडी, बाबासाहेब पवार उपस्थित होते.
चौकट
मानसिंगराव नाईक यांना अश्रू अनावर
लोकनेते फत्तेसिंगअप्पांच्या जीवनप्रवासाच्या चित्रफितीचे अनावरण खासदार पवार यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी आप्पांच्या आठवणी सांगत असताना आमदार मानसिंगराव नाईक यांना अश्रू अनावर झाले.